रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वेवर सांताक्रुज ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक

Updated: Dec 8, 2018, 01:53 PM IST
रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक  title=

मुंबई : उद्या अर्थात रविवारी बाहेर पडण्याच्या विचारात असाल तर रेल्वे मार्गांवरची अपड़ेट घेऊन बाहेर पडणं तुमच्यासाठी गरजेचं ठरणार आहे. कारण, रविवारी रेल्वेच्या तिनही मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आलाय. मध्य रेल्वे, हार्बर, पश्चिम रेल्वेवर मार्गावर रविवार ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ४.३० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा धीम्या मार्गावर, हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रुज ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

मध्य रेल्वेवर ब्लॉक कालावधीत ठाण्याहून स. १०.३७ ते दु. ४.०२ पर्यंत सुटणाऱ्या सर्व लोकल मुलुंड आणि माटुंगा स्थानकापर्यंत सर्व धीम्या लोकल जलद मार्गावर चालतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून स. १०.१६ ते दु. २.५४ सुटणाऱ्या सर्व डाउन जलद, अर्धजलद लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकात थांबतील. कल्याणहून सुटणाऱ्या सर्व जलद, अर्धजलद लोकल स. ११.०४ ते दु. ३.०६ पर्यंत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकात थांबतील. सीएसएमटीहून ये-जा करणाऱ्या सर्व लोकल स. ११ ते सायं. ५ पर्यंत सुमारे १० मिनिटांपर्यंत उशिराने धावतील. 

हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाउन मार्गावर स. ११.१० ते दु. ३.४० पर्यंत मेगाब्लॉक असेल. सीएसएमटी ते पनवेल-बेलापूर-वाशी स. १०.३४ ते दु. ३.८ आणि पनवेल-बेलापूर-वाशी ते सीएसएमटी मार्गावरील सेवा स. १०.२१ ते दु. ३.०० पर्यंत सेवा खंडित राहणार आहे. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी-पनवेल मार्गावर विशेष लोकल चालवल्या जातील.

पश्चिम रेल्वेचा जम्बो ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुज ते गोरेगाव स्थानकादरम्यान स.१०.३५ ते दु. ३.३५ वाजेपर्यत अप आणि डाउन जलद मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लाक दरम्यान अप-डाउन जलद मार्गावरील वाहतूक अप-डाउन धिम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. तसेच काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.