बेस्ट संघटना संपावर ठाम; कोर्टाच्या आदेशानंतरही माघार घेण्यास नकार

बेस्ट कृती समितीने संप मागे घेऊन उच्चस्तरिय समितीशी चर्चा करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले.

Updated: Jan 15, 2019, 06:30 PM IST
बेस्ट संघटना संपावर ठाम; कोर्टाच्या आदेशानंतरही माघार घेण्यास नकार title=

मुंबई - बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने संप मागे घ्यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. बेस्ट कृती समितीने संप मागे घेऊन उच्चस्तरिय समितीशी चर्चा करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. पण बेस्टचा संप सुरूच राहणार असल्याचे शशांक राव यांनी स्पष्ट केले. वेतनाचे १० टप्पे दिले जात असले, तरी ते खूप कमी आहेत. शिवाय २००७ पासूनची तफावत आहे. ती १० टप्प्यांमध्ये भरून निघत नाही. उच्चस्तरिय समितीने कोर्टात दिलेली कॉपी आम्हाला मिळालेली नाही. त्यामुळे संप तूर्त सुरूच राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.

मुंबईत गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अद्याप मिटलेला नाही. या प्रकरणी मंगळवारी दुपारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने संप मागे घेण्याचे निर्देश दिले. न्यायालयाच्या निर्देशानंतर आता संपकरी संप मागे घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  बेस्टच्या संपामुळे सामान्य मुंबईकर प्रवासी, चाकरमाने, वृद्ध, रुग्ण, महिला, विद्यार्थी यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्याचबरोबर हा संप मिटवण्यात अपयशी ठरल्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि राज्य सरकारवर नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. 

बेस्ट संपाबाबत मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मंगळवारी कुठलाच तोडगा निघाला नाही. बैठकीत कामगार संघटनांच्या मागण्या आणि त्यातील त्रुटींवर चर्चा झाली. मात्र कुठलाच तोडगा निघू शकला नाही. आता या प्रकरणी नेमण्यात आलेली उच्चस्तरीय समिती न्यायालयात अहवाल सादर करणार आहे. या अहवालानंतर न्यायालय जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया बैठकीनंतर बेस्ट कृती समितीचे नेते शशांक राव यांनी दिली होती. गेल्या मंगळवारी आपल्या मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. त्यानंतर याप्रकरणी मध्यस्थी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महापौर बंगल्यात बैठकाही झाला. पण त्यातून कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर मुख्य सचिव डी. के. जैन यांच्या नेतृत्त्वाखाली कामगार नेते आणि बेस्ट प्रशासन यांच्यासोबत मंत्रालयात बैठक झाली होती. पण त्यातूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. 

बेस्टच्या संपावर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे. आठ दिवसांपासून केवळ चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. पण त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. त्यामुळे संप मिटवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा सामान्य मुंबईकरांनी व्यक्त केली आहे.