Video: 'रिकाम्या' बॅगमध्ये सापडलं 100 कोटींचं कोकेन! मुंबईत 2 परदेशी महिलांना अटक

Mumbai DRI Seizes Rs 100 Crore Cocaine: अशाप्रकारची तस्करी होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार ट्रॅप रचण्यात आला असता इंडोनेशिया, थायलंड आणि थेट नायझेरियन नागरिक पोलिसांच्या तावडीत सापडला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 20, 2024, 08:00 AM IST
Video: 'रिकाम्या' बॅगमध्ये सापडलं 100 कोटींचं कोकेन! मुंबईत 2 परदेशी महिलांना अटक title=
डीआरआयची मोठी कारवाई

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला (डीआरआय) मोठं यश मिळालं आहे. अंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या रॅकेट डीआरआयने उद्धवस्त केलं असून इथियोपीयामधून भारतात तस्करी करण्यात येत असलेलं 100 कोटींचं कोकेन अंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडण्यात आलं आलं आङे. या कारवाईत डीआरआयने 9.829 किलो कोकेन जप्त केलं आहे. मुंबईमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. डीआरआयने जप्त केलेल्या कोकेनची अंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत 100 कोटींहून अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणामध्ये डीआरआयने 2 महिला प्रवाशांना ताब्यात घेतल्याची माहिती प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या पत्रकात दिली आहे.

इंडोनेशिया आणि थायलंडच्या महिलेला अटक

अटक करण्यात आलेल्या महिलांपैकी एक महिला इंडोनेशियाची आणि दुसरी थायलंडची आहे. या दोघीही इथियोपीयामधून अदिस अबाबमधून भारतात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. डीआरआयने केलेल्या तपासामध्ये सदर अमली पदार्थ हे नवी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरांमध्ये वितरित करण्याचा प्लॅन होता. मुंबईमध्ये तैनात करण्यात आलेल्या डीआरआयच्या टीमला मोठ्याप्रमाणात अमली पदार्थांची मुंबईतून दिल्लीला तस्करी केली जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एका टीमला दिल्लीमध्ये अलर्ट करण्यात आलं. एकीकडे मुंबईमध्ये या दोन महिलांविरोधात कारवाई करताना या रॅकेटमधील दिल्लीतील सूत्रधार ताब्यात घेण्यासाठी ही टीम पाठवण्यात आली.

दिल्लीतही अटकसत्र

मुंबईमधून दिल्लीला गेलेल्या तुकडीला अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या महिलांना ताब्यात घेण्यात यश आलं. पोलिसांनी नोएडामधील स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने या महिलांना ताब्यात घेण्यासाठी ट्रॅप रचला. या संपूर्ण रॅकेटमधील मुख्य सूत्रधार कोण हे अधिकाऱ्यांना शोधून काढायचं होतं. मात्र पोलिसांबरोबर झालेल्या झटापटीमध्ये दिल्लीतील सूत्रधार पोलिसांना धक्का देऊन पळून गेला. मात्र पोलिसांनी फिल्मी स्टाइल पाठलाग करत दिल्लीतील प्रमुख सूत्रधार असलेल्या नायझेरियन व्यक्तीला अटक केली. त्याच्या सहकाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आलं. या झटापटीमध्ये अधिकारी आणि आरोपीलाही किरकोळ जखमा झाल्या.

'रिकाम्या' बॅगेत सापडले 100 कोटींचे कोकेन

पोलिसांनी मुंबईत पकडलेल्या 2 महिला आणि दिल्लीत अटक करण्यात आलेल्या दोघांविरोधात एनडीपीएस कायदा, 1985 अंतर्गत अटक करण्यात आली. अंतरराष्ट्रीय तस्करांच्या हाती हे अमली पदार्थ पडण्याआधीच डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई केल्याने हे यश मिळालं. सदर गट हा इथियोपीया आणि भारताबरोबरच श्रीलंकेमध्येही अमली पदार्थांची तस्करी करत असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईमध्ये अटक करण्यात आलेल्या महिला या रिकाम्या दिसणाऱ्या बॅगमधून अमली पदार्थांची तस्करी करत होत्या. बॅगच्या आतमध्ये कळणार नाही अशापद्धतीने कप्पा तयार करुन त्याहून हे 9 किलोहून अधिक वजनाचं कोकेन नेलं जात होतं. अधिकाऱ्यांनी ही बॅग कशाप्रकारे तोडली आणि त्यातून अमली पदार्थ बाहेर काढले याचा व्हिडीओ समोर आला आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...

तस्करी रोखण्याचे प्रयत्न

भारतामधून चालणारं किंवा देशांतर्गत अमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं उद्धवस्त करण्याच्या उद्देशाने डीआरआय काम करते. देशात परदेशामधून कोणतेही अमली पदार्थ येऊ नयेत तसेच आले तर ते देशात प्रवेश करण्याआधीच विमानतळ किंवा बंदरांवरच रोखले जावेत असा डीआरआयचा प्रयत्न असतो, असं डीआरआयने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.