मुंबई पालिका कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत, शशांक रावांचा पालिकेकडे मोर्चा

बेस्टचा संप संपतो न संपतो तोच मुंबई महापालिकेतही कर्मचाऱ्यांच्या संपाची टांगती तलवार आहे.  

Updated: Jan 16, 2019, 07:42 PM IST
मुंबई पालिका कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत, शशांक रावांचा पालिकेकडे मोर्चा  title=

मुंबई : बेस्टचा संप संपतो न संपतो तोच मुंबई महापालिकेतही कर्मचाऱ्यांच्या संपाची टांगती तलवार आहे. बेस्टच्या संपानंतर शशांक राव यांनी मुंबई महापालिकेकडे मोर्चा वळवला आहे. मुंबई महापालिकेत गेल्या पाच वर्षांपासून वेतन करार झालेला नाही. या प्रश्नाची तड लावण्यासाठी संप करायचा का, या मुद्द्यावर फेब्रुवारीत कर्मचाऱ्यांचे मतदान घेण्यात येणार आहे. या मतदानामध्ये कामगारांचा जो कौल असेल त्यानुसार पुढची पावले उचलली जाणार आहेत.

बेस्ट संपानंतर शशांक राव आक्रमक

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांचा वेतन प्रशन मार्गी लावण्यासाठी शशांक राव आक्रमक झाले आहेत. बेस्ट संपानंतर त्यांनी मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा प्रश्न हाती घेतला आहे. त्यानुसार आता मुंबई पालिका कर्मचाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील दिशी ठरविण्यात येणार आहे. पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारीत संपाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मुंबई पालिका कर्मचारी आपल्या वेतनवाढीसाठी संपावर जाण्याची तयारी करत असल्याचे दिसून येत आहे.

 'बेस्ट'चा संप मागे, पहिली बस धावली

दरम्यान, तब्बल ९ दिवसांनी अखेर 'बेस्ट'चा संप मागे घेण्यात आला आहे. मुंबी उच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीमध्ये बेस्ट प्रशासनानं मांडलेल्या १० टप्पे वेतनवाढीवर  कामगार संघटनांची सहमती असल्याचं स्पष्ट झाले. पुढचे १० टप्पे वेतनवाढीसाठी महिनाभरात त्रयस्थ समितीच्या माध्यमातून तोडगा काढण्यात येणार आहे. यंदाच्या जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना पगारवाढ लागू होणार आहे. त्यानुसार बेस्ट कर्मचारी संघटनेचे शशांक राव यांनी वडाळा आगारात संपकरी कामगारांसमोर संप मागे घेतल्याची घोषणा केली. कर्मचाऱ्यांना किमान ७ हजार रुपये वेतनवाढ मिळेल तसंच १ एप्रिल २०१६पासून भरपाई दिली जाईल, असंही राव यांनी जाहीर केले. राव यांच्या घोषणेनंतर कामगारांनी एकच जल्लोष केला. या जल्लोषातच घाटकोपर आगारातून पहिली बस रवाना झाली.