छत्रपतींच्या नावानं... एक गौप्यस्फोट

छत्रपतींच्या नावानं राज्य सरकारचा किती पारदर्शक कारभार सुरू आहे, याचा एक अफलातून नमुना आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

Updated: Apr 9, 2018, 09:29 PM IST
छत्रपतींच्या नावानं... एक गौप्यस्फोट

दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : छत्रपतींच्या नावानं राज्य सरकारचा किती पारदर्शक कारभार सुरू आहे, याचा एक अफलातून नमुना आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. शिवाजी महाराजांचं नाव घेत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा कारभार... शिवाजी पार्कमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या नूतनीकरणाचं काम सध्या सुरू आहे. पण त्यामध्ये प्रचंड घोळ आहे. गतिमानता एवढी की निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच काम सुरू झालंय. पाहुयात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराचा हा स्पेशल रिपोर्ट.

सार्वजनिक बांधकाम विभागाचा पराक्रम

महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवरायांच्या शिवाजी पार्कवरच्या पुतळ्याच्या डागडुजीचं हे काम सुरू आहे. याच कामात विद्यमान भाजप सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं एक पराक्रम केलाय. या कामासाठी निविदा काढण्यात आल्या, त्यासाठी २२ मार्चला वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आली. ११ एप्रिलपर्यंत निविदा भरण्याची मुदत आहे. तर १३ एप्रिलला या निविदा उघडण्यात येणार आहेत. पण हे सगळं होण्याआधीच पुतळ्याच्या डागडुजीचं आणि सुशोभीकरणाचं काम सुरू झालंय.

दोन्ही कामं विनामूल्य मात्र...

शिवरायांच्या पुतळ्याच्या परिसराचं नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचं काम वास्तूरचनाकार चेतन रायकर करतायत. तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या रंगरंगोटीचं काम प्रसिद्ध मूर्तीकार संतोष कांबळी करतायत. फक्त साधन सामुग्रीचा खर्च सोडला तर हे काम दोघंही विनामूल्य करतायत.

आता निविदेत कसा घोळ घातलाय पाहुया...

मूळ काम आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं नूतनीकरण. त्यासाठी ९ लाख ९४ हजार चारशे आठ रुपये इतकी रक्कम निविदेत ठरवण्यात आलीय. त्याच्या आडून आणखी दोन प्रकारची कामं निविदेत घुसवण्यात आलीय. पाहूयात काय आहेत ही कामं...

१ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी शिवाजी पार्क मैदान तयार करणं, शामियान्यासाठी मैदान तयार करणं, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची रंगरंगोटी करणं तसेच संलग्न कामांची व्यवस्था करणं यासाठी तब्बल २५ लाख ९२ हजार आठशे ब्याऐंशी रुपये ठरविण्यात आले आणि दुसरं काम म्हणजे महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी शिवाजी पार्क मैदानात शामियाना उभारणं, फर्निचर पुरवणं तसंच बांबूंची अडवण व्यवस्था करणं, फुलांची सजावट करणं यासाठी १९ लाख ब्याऐंशी हजार आठशे बत्तीस रुपये इतकी रक्कम खर्च करण्याचे ठरलंय.

एवढा खर्च कशासाठी?

मुळात निविदांची अजून मुदतही संपलेली नाही, त्याआधीच हे काम सुरू झालंच कसं... आणि काम विनामूल्य होत असताना त्याच्यासाठी एवढा मोठा खर्च कशासाठी? हे उपस्थित होणारे स्वाभाविक प्रश्न... 

छिंदम प्रकरणात आधीच पोळून निघालेली भाजप, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कारभारामुळे आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. पुतळा नूतनीकरणाच्या कामात जनतेला अंधारात ठेवून अशी अपारदर्शक कामं होणार असतील तर छत्रपतींचे अरबी समुद्रातील स्मारक उभारताना आणखी काय काय पाहावे लागणार आहे याची कल्पना न केलेलीच बरी !

छत्रपतींच्या नावानं... एक गौप्यस्फोट

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close