मुंबई ते पुणे, नाशिक, शिर्डी टॅक्सी प्रवास महागला; आता इतकं द्यावं लागणार भाडे

Shared Taxi Fares : मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी टॅक्सी प्रवास आता महागला आहे. एमएमआरटीएच्या बैठकीनंतर या मार्गावरील टॅक्सी भाड्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

आकाश नेटके | Updated: Mar 29, 2024, 04:53 PM IST
मुंबई ते पुणे, नाशिक, शिर्डी टॅक्सी प्रवास महागला; आता इतकं द्यावं लागणार भाडे title=

Mumbai News : मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी प्रवास करणाऱ्यांच्या प्रवाशांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे. कारण या मार्गावरील टॅक्सी किंवा कॅबच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) मुंबईहून नाशिक, शिर्डी, पुणे या तीन मार्गांवर धावणाऱ्या काळी-पिवळी टॅक्सी आणि वातानुकूलित टॅक्सीच्या भाड्यात सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता या टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांच्या खर्चात वाढ होणार आहे.

एमएमआरटीएच्या नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना मुंबईहून टॅक्सीने पुणे, नाशिक किंवा शिर्डीसाठी प्रवास करताना जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. मुंबईहून नाशिकला जाणाऱ्या वातानुकूलित टॅक्सी प्रवासासाठी अधिकचे 100 रुपये, शिर्डीसाठी अधिकचे 200 रुपये मोजावे लागणार आहेत. तर, मुंबई ते पुणे प्रवासासाठी वातानुकूलित आणि साध्या टॅक्सी प्रवासासाठी प्रवाशांना अतिरिक्त 50 रुपये जादा द्यावे लागणार आहेत. 

मुंबई-पुणे टॅक्सी मार्ग 155 किमी लांबीचा आहे, तर मुंबई-नाशिक आणि मुंबई-शिर्डी अनुक्रमे 175 किमी आणि 265 किमी लांबीचा आहे. एमएमआरटीएने तीन वर्षांपूर्वी मुंबई-पुणे मार्गावरील टॅक्सी भाडेवाढ केली होती. मात्र मुंबई-नाशिक आणि मुंबई-शिर्डी मार्गावरील टॅक्सी भाडे सप्टेंबर 2013 पासून कायम होते. त्यानंतर आता ही भाडेवाढ झाली आहे.

प्रवाशांना किती पैसे खर्च करावे लागणार?

मुंबई-नाशिक मार्गावरील एसी टॅक्सीचे भाडे 475 रुपयांवरून 635 रुपये होणार आहे. तर, आणि मुंबई-शिर्डी वातानुकूलित टॅक्सीचे सध्याचे भाडे 575 रुपयांवरून 825 रुपये होणार आहे. मुंबई-पुणे मार्गावरील साध्या टॅक्सीचे भाडे 450 रुपयांवरून 500 रुपये आणि वातानुकूलित टॅक्सीचे भाडे 525 रुपयांवरून 575 रुपये असणार आहे.

टॅक्सी भाड्यामध्ये वाढ करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या खटुआ समितीच्या अहवालानुसार मुंबई टॅक्सी संघटनेने केलेल्या मागण्यानंतर या सुधारित भाडेवाडीस मान्यता देण्यात आली. असं असले तरी ही भाडेवाढ कधी लागू पासून लागू करण्यात येणार याची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र पुढील महिन्यापासून सुधारित भाडेवाढ लागू होण्याची शक्यता आहे.