एक दिवस कराची भारतात असेल – देवेंद्र फडणवीस

वांद्रे येथील कराची स्वीट्सच्या दुकानावरून वक्तव्य    

Updated: Nov 23, 2020, 12:29 PM IST
एक दिवस कराची भारतात असेल – देवेंद्र फडणवीस title=

मुंबई : एक दिवस कराची भारताचा भाग असेल असं वक्तव्य विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. दरम्यान शिवसेना नेते  नितीन नांदगावकर यांनी मुंबईत असलेल्या कराची स्वीट्स आणि बेकरीचं नाव बदलण्याची मागणी केली होती. कराची हे पाकिस्तनातील एक शहर आहे, त्यामुळे कराची या नावावरून भारतीय जवानांचा अपमान होत असल्याचं सांगत नांदगावकर यांनी स्वीट्सच्या दुकानाचं नाव बदल्याची मागणी केली होती. त्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराची एक दिवस भारतात असेल.. असं वक्तव्य  केलं आहे. 

यासंदर्भातील एक ट्विट एएनआयने केलं आहे. त्यामध्ये फडणवीस म्हणतात, 'आम्हाला 'अखंड भारत'वर विश्वास आहे. शिवाय एक दिवस असा येईल जेव्हा संपूर्ण कराची भारतात असेल.' कराची हे स्वीटचं दुकान वांद्रे भागात आहे. 

गेल्या ६० वर्षांपासून हे दुकान कराची या नावावरून मुंबईत आहे. त्यामुळे त्यांचा पाकिस्तानसोबत संबंध आहे यात काही अर्थ नाही. शिवाय दुकानाचं नाव बदलावं यात देखील काही तथ्य नाही. त्याचप्रमाणे दुकानाचं नाव बदल्यात यावं अशी शिवसेनेची भूमिका नाही. असं स्पष्टीकरण शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिलं.