बेस्टचा अमृत महोत्सवी सोहळा! 'बेस्ट'शी जोडलेल्या 'बेस्ट' आठवणी लिहिण्याची मुंबईकरांना संधी

सेलिब्रेटी असो की सामान्य व्यक्ती, प्रत्येक मुंबईकराचं 'बेस्ट'शी नातं जुळलं आहे, बेस्ट प्रवासातल्या आठवणींना उजाळा देण्याची संधी

मेघा कुचिक | Updated: Jun 15, 2022, 08:21 PM IST
बेस्टचा अमृत महोत्सवी सोहळा! 'बेस्ट'शी जोडलेल्या 'बेस्ट' आठवणी लिहिण्याची मुंबईकरांना संधी title=

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : मुंबईत लोकलप्रमाणेच 'बेस्ट' (BEST) बस हीदेखील मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. मुंबईकरांसाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यात धावणारी 'बेस्ट' मुंबईची शान आहे. या 'बेस्ट'ला 7 ऑगस्ट रोजी 65 वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने बेस्ट अमृतमहोस्तवी सोहळा आयोजित करणार आहे. 

अमृत महोत्सवी सोहळयाचा भाग म्हणून उपक्रमाने 'बेस्ट' वार्ता या आपल्या मुखपत्राचा बेस्ट दिन विशेषांक प्रसिध्द करण्याचं ठरवलं आहे. यामध्ये मुंबईकरांना आपल्या बेस्टबरोबरच्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळणार आहे.  बेस्टने आपल्या आठवणी लिहून पाठवण्याची विनंती केली आहे. 

या मुखपत्रात सर्व माजी बेस्ट समिती अध्यक्ष, सर्व माजी महाव्यवस्थापक, सर्व आजी माजी महापालिका आयुक्त यांचे अनुभव आणि आठवणी असणार आहेत. याखेरीज प्रथितयश कलाकार, खेळाडू, आणि प्रसिद्ध किंवा मोठ्या व्यक्तिंचे अनुभवही मुंबईकरांना वाचायला मिळणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबईच्या नागरिकांना बेस्टबरोबरच्या आठवणी लिहिण्याची संधीदेखील बेस्टने उपलब्ध केली आहे. 

या लिंकवर पाठवा आपल्या आठवणी
याशिवाय या उपक्रमांतर्गत प्रवासी संघटना तसंच उपक्रमाचे माजी कर्मचारी, अधिकारी यांनी बेस्टबद्दलचे आपले अनुभव, आठवणी आदि साहित्य लिहून बेस्टला पाठवता येणार आहे. मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत सुमारे तीनशे शब्दांमध्ये मुंबईकरांना बेस्टबाबतच्या आठवणी लिहिता येणार आहे. जनता संपर्क अधिकारी, बेस्ट उपक्रम, बेस्ट भवन, मुंबई- 400 001 यांच्याकडे ईमेलद्वारे (probestundertaking@gmail.com) दिनांक 30 जून 2022 पर्यंत मुंबईकरांना आपले अनुभव किंवा आठवणी लिहून पाठता येतील. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांचा बेस्ट प्रवास 
मुंबईत खरतर अनेक लहान-थोरांच्या बेस्टशी आठवणी आणि एकप्रकारे भावना जुळलेल्या आहेत. अगदी आपला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दादर इथल्या शिवाजी पार्क इथे सरावासाठी सुरुवातीच्या दिवसात बांद्रा पूर्व इथून प्रवास करत असे. एवढच नव्हे तर सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही काही दिवांसपूर्वी बेस्टच्याच एका कार्यक्रमात त्यांच्या लहाणपणीच्या बेस्टमधील प्रवासामधील किस्सा भाषणात सांगितला होता. 

अनेक क्रिकेटपटू, कलाकार, लेखक, अधिकारी नावाजलेले वकील, डॉक्टर्स, इंजिनिअर्स साऱ्यांनीच लहाणपणी कधी ना कधी बेस्टमधून नक्कीच प्रवास केलेला असतो. त्यांचे अनुभव आणि आठवणी वाचण्याची संधीही एकप्रकारे या मुखपत्राद्वारे मुंबईकरांना मिळणार आहे.

दिवसेंदिवस मुंबईच्या बेस्ट बसचा झालेला कायापाटलही आपण पाहिला आहे. सद्या डिझेलवर चालणाऱ्या बसेस आहेत. मात्र काही वर्षांनंतर मुंबईत तब्बल दहा हजार बेस्ट बसेस या इलेक्ट्रीक बसेस असतील असा महत्वाकांक्षी उपक्रम राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आखला आहे. जर या उपक्रमाला यश आलं तर मुंबईतील प्रदूषणाला आळा बसेल आणि अशाप्रकारे इलेक्ट्रीक बस मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर उतरवणारी मुंबई महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरेल.