पुणेकरांनी लोकसभेचा वचपा काढला; विधानसभेच्या मतदानात मुंबईकरांवर मात

लोकसभा निवडणुकीला पुण्यात अवघे ४९.८४ टक्के मतदान झाले होते.

Updated: Oct 21, 2019, 09:40 PM IST
पुणेकरांनी लोकसभेचा वचपा काढला; विधानसभेच्या मतदानात मुंबईकरांवर मात title=

मुंबई: लोकसभा निवडणुकीवेळी मतदानाच्या कमी टक्केवारीमुळे सोशल मीडियावर पुणेकरांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. विशेषत: मुंबईकरांनी यावरून पुणेकरांना प्रचंड टोमणे लगावले होते. मात्र, या विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी मतदानाच्या टक्केवारीत मुंबईकरांना मागे टाकले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुण्यात ६१.७२ टक्के मतदान झाले. तर मुंबईत यावेळी मतदारांचा निरुत्साह दिसून आला. त्यामुळे मुंबईत अवघे ५० टक्केच मतदान होऊ शकले. पुण्याच्या शहरी भागांमध्येही मतदानाचा फारसा जोर नव्हता. मात्र, ग्रामीण भागातील मतदानामुळे ही कसर भरून निघाली. 

त्यामुळे आता पुणेकरांना लोकसभा निवडणुकीवेळी सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलिंगची सव्याज परतफेड करण्याची संधी चालून आली आहे. लोकसभा निवडणुकीला पुण्यात अवघे ४९.८४ टक्के मतदान झाले होते. यावरून अनेकांनी पुणेकरांना ट्रोल केले होते. 'ईव्हीएमची घरपोच डिलिव्हरी करायची का?', पुण्यात मतदान ५० टक्के, पण इतरांना अक्कल शिकवायचे प्रमाण १०० टक्के, 'पुण्यात ४९ टक्के लोकांनी बोट काळे केले, ५१ टक्क्यांनी तोंड!' '१ ते ४ दुपारच्या झोपेचा परिणाम दिसतोय', 'मतदानाच्या दिवशी पुणेकर पुस्तक दिनात व्यस्त', असे संदेश आणि मिम्स सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. 

एक्झिट पोल: शिवसेनेला मोठा धक्का; २०१४ पेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता

दरम्यान, लोकसभा निवडणुकीला मुंबईत तब्बल ५४.५० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते.  मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीला मुंबईकरांनी सपशेल निराशा केली आहे. सकाळच्या सत्रात मुंबईतील मतदानाची आकडेवारी १० टक्क्यांच्या आत होती. मात्र, यानंतर मतदार घराबाहेर पडल्याने मुंबईतील मतदानाची टक्केवारी कशीबशी ५० टक्क्यांपर्यंत पोहोचली. 

एक्झिट पोल: पश्चिम महाराष्ट्रात पवार फॅक्टर निष्प्रभ; महायुतीचाच वरचष्मा