close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

एक्झिट पोल: शिवसेनेला मोठा धक्का; २०१४ पेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता

तडजोड करून भाजपसोबत युती करणाऱ्या शिवसेनेला उलट फटका बसल्याचे दिसत आहे.

Updated: Oct 21, 2019, 07:04 PM IST
एक्झिट पोल: शिवसेनेला मोठा धक्का; २०१४ पेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता

मुंबई: विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता 'झी २४ तास'च्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत ६३ जागांवर जिंकलेल्या शिवसेनेची ५५ जागांपर्यंत घसरण होऊ शकते. ही शक्यता खरी ठरल्यास भाजपकडून लहान भाऊ म्हणून हिणवण्यात येणाऱ्या शिवसेनेवर नामुष्कीची वेळ ओढावेल. 

झी २४ तास आणि 'पोल डायरी' यांनी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणात भाजपला १२१-१२८, शिवसेना ५५ ते ६४, काँग्रेस ३९ ते ४६, राष्ट्रवादी काँग्रेस ३५ ते ४२, वंचित १ ते ४ आणि मनसेला १ ते ५ जागांवर विजय मिळवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ही परिस्थिती पाहता २०१४ च्या तुलनेत भाजपची स्थिती 'जैसे थे' राहील. मात्र, तडजोड करून भाजपसोबत युती करणाऱ्या शिवसेनेला उलट फटका बसल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांचा मोठा हिरमोड होण्याची शक्यता आहे. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेकडून सातत्याने मुख्यमंत्रीपदावर दावा केला जात होता. यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे करण्यात आले होते. मात्र, एक्झिट पोलची आकडेवारी पाहता आता महायुतीमधील शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये शिवसेनेने कर्जमाफी आणि नाणार प्रकल्पासारख्या मुद्द्यांवरून सरकारविरोधी भूमिका घेतली होती. मात्र, आता शिवसेनेच्या जागा कमी झाल्यास शिवसेनेला आपली आक्रमक भूमिका कायम ठेवता येणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

दरम्यान, एबीपी आणि सी व्होटर्सच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला १९२ ते २१६ जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर आघाडीला ५५ ते ८१ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.