राहुल गांधींनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावं ही कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा: अशोक चव्हाण

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे निवेदन

Updated: Aug 23, 2020, 11:10 PM IST
राहुल गांधींनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावं ही कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा: अशोक चव्हाण  title=

मुंबई : राहुल गांधी यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारवं म्हणून आता देशभरातील नेते आणि कार्यकर्ते राहुल गांधी यांना आवाहन करत आहेत. राज्यातील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यानंतर आता अशोक चव्हाण यांनी देखील राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावं म्हणून निवेदन दिलं आहे.

अशोक चव्हाण यांनी निवेदनात म्हटलं की, 'भारताची एकता, अखंडता तसेच प्रगतीमध्ये नेहरू-गांधी कुटुंबानी दिलेले योगदान अपूर्व आहे. देश व काँग्रेस पक्ष संघटीत ठेवण्यासाठी पुढील काळातही त्यांच्या सक्रिय नेतृत्वाची नितांत गरज आहे. पक्षाला एकजीव ठेवण्याची, बांधून ठेवण्याची क्षमता केवळ गांधी कुटुंबाकडे आहे आणि इतिहासातही हे अनेकदा सिद्ध झाले आहे. या वास्तवाची जाणिव ठेवूनच पक्षाची पुढील वाटचाल झाली पाहिजे.'

'पक्षाच्या अध्यक्ष पदासंदर्भात काँग्रेस कार्यसमिती निर्णय घेईल. परंतू खासदार राहुलजी गांधी यांनी पक्षाचे अध्यक्ष पद स्वीकारावे, अशी कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा आहे. राहुलजी गांधी हे सक्षम, संयमी व संवेदनशील नेते आहेत. सर्वसामान्यांच्या व्यथांना त्यांनी नेहमीच अत्यंत दूरदर्शीपणे व नेमकी वाचा फोडली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर व्यापक देशहिताची भूमिका परखडपणे मांडली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व त्यांनी करावे, ही आमची मागणी आहे.' असं ही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

'खासदार सोनियाजी गांधी यांनी अडचणीच्या काळात काँग्रेस पक्षाला उभारी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युपीए-१ आणि युपीए-२ च्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात सर्वसामान्यांना न्याय देणारे, देशाला विकासाची नवी दिशा देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय झाले. कोणतीही महत्वाकांक्षा न बाळगता केवळ कर्तव्यभावनेतून त्यांनी देश व काँग्रेसची सेवा केली. त्यामुळे पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत त्या योग्य व सर्वमान्य निर्णय घेतील, याचा मला पूर्ण विश्वास आहे.' असं ही त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे.