'सुकाणू' आणि शेतकरी आंदोलनाचं पुढे काय होणार?

शेतक-यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीमध्ये उभी फूट पडलीय. त्यामुळे 1 जूनपासून सुरु झालेल्या शेतकरी आंदोलनाचं पुढं काय होणार असा सवाल उपस्थित होतोय. 

Updated: Jun 10, 2017, 06:08 PM IST
'सुकाणू' आणि शेतकरी आंदोलनाचं पुढे काय होणार? title=

मुंबई : शेतक-यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीमध्ये उभी फूट पडलीय. त्यामुळे 1 जूनपासून सुरु झालेल्या शेतकरी आंदोलनाचं पुढं काय होणार असा सवाल उपस्थित होतोय. 

शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या लढ्याला सरकार दरबारी पोहचवण्यासाठी सुकाणू समितीची घोषणा करण्यात आली. या समितीमध्ये विविध शेतकरी नेत्यांचा समावेश करण्यात आला.  यानंतर सुकाणू समितीची गुरुवारी नाशिकमध्ये बैठकही पार पडली. यावेळी शेतक-यांच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. 

मात्र, याच समितीमध्ये आता भांड्याला भांडं लागण्यास सुरुवात झालीय. सरकारशी चर्चा करायची की नाही या मुद्यावरुन सुकाणू समितीमध्येच दोन गट पडले आहेत. सुकाणू समितीमध्ये एकवाक्यता नसल्याचा आरोप शेतकरी नेते अनिल घनवट यांनी केलाय. तर शेतकरी नेते गिरीधर पाटील यांनी तर समितीवर राजकीय थिल्लरपणाचा आरोप केलाय. तर सुकाणू समितीचे सदस्य आणि आमदार बच्चू कडू यांनी सगळ्यांना एकत्र राहण्याचा सल्ला दिलाय. 

सुकाणू समितीमध्ये पडलेल्या या उभ्या फूटीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सरकारनं स्थापन केलेल्या मंत्रिगटाशी समिती सदस्यांशी चर्चा होणार आहे. मात्र अंतर्गत वादामुळे शेतक-यांच्या हिताचे प्रश्न आणि आंदोलनाच्या मूळ हेतूला धक्का लागू एवढीच माफक अपेक्षा आता बळीराजाच व्यक्त करतोय.