Loksabha : '...तर सुप्रिया सुळे जेलमध्ये जातील', केजरीवालांच्या वक्तव्यावर मंचावर बसलेले शरद पवार खदकन हसले

Arvind Kejariwal On MahaVikas Aghadi Sabha : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भिवंडीमध्ये महाविकास आघाडीच्या सभेत उपस्थिती लावली अन् भाजपवर घणाघाती टीका केली. त्यावेळी केजरीवालांच्या एका वक्तव्यावर शरद पवार (Sharad Pawar) हसले.

सौरभ तळेकर | Updated: May 17, 2024, 07:33 PM IST
Loksabha : '...तर सुप्रिया सुळे जेलमध्ये जातील', केजरीवालांच्या वक्तव्यावर मंचावर बसलेले शरद पवार खदकन हसले title=
Arvind Kejariwal On MahaVikas Aghadi Sabha

Maharashtra Politics : राज्यात लोकसभा निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यातील प्रचार आता रंगतदार स्थितीत आलाय. येत्या 20 मे रोजी मुंबईत मतदान होणार आहे. त्यामुळे आता सभा आणि बैठकांचा धडाका सुरू झालाय. अशातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भिवंडीमध्ये महाविकास आघाडीच्या सभेत दमदार भाषण केलं. त्याआधी शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांची भिवंडीत भेट झाली. यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे आणि आपचे खासदार संजय सिंह हेदेखील उपस्थित होते. सभेत बोलताना अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्यावेळी केजरीवाल असं काही बोलले की, शरद पवारांना देखील खदकन हसले. 

अरविंद केजरीवाल यांनी भाजपला निशाण्यावर घेतलं अन् मोदींवर घणाघाती टीका केली. त्यावएळी, जर भाजप पुन्हा सत्तेत आली तर सुप्रिया सुळे, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सगळे जेलमध्ये जातील, असं अरविंद केजरीवाल यांनी केलं. अरविंद केजरीवाल यांचं वक्तव्य ऐकताच मंचावर उपस्थित असलेले शरद पवार खदकन हसले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी चुळबूळ केल्याने शरद पवारांनी कार्यकर्त्यांना खाली बसण्याचं आवाहन केलं. अरविंद केजरीवालांनी सभेचा नूर पकडला अन् शरद पवारांचं कौतूक केलं. 

अरविंद केजरीवाल काय म्हणाले?

देशाला वाचवण्याची भीक मी तुमच्यासमोर मागायला आलोय. मी स्वत:साठी वोट मागायला आलो नाही. मी एवढ्या लवकर सुटेल, याची मला अपेक्षा नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने मला 21 दिवसासाठी जामीन दिल्यामुळे मला त्यांचे आभार मानायचे आहेत. त्यांनी मला जेलमध्ये पाठवलं. दिल्लीत मी गरिबांच्या मुलांना शिक्षण दिलं, त्यामुळे मला अटक करण्यात आली. मोदींना वाटत नाहीये की गरिबांच्या मुलांनी शिकावं, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली. 

मी मधुमेहाचा रुग्ण आहे. पण तुरूंगात असताना यांनी मला 15 दिवस गोळ्या दिल्या नाही. मला माहिती नाहीये, यांना माझ्यासोबत काय करायचं होतं, असं वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी स्वत:साठी वोट मागत नाही तर अमित शहा यांना पंतप्रधान करण्यासाठी मत मागत आहेत. भाजपच्या मोठ्या नेत्यांना बाजूला केलं गेलं. देवेंद्र फडणवीस, शिवराजसिंग चौहान, वसुंदरा राजे यांना बाजूला केलं गेलं. सगळे गेले पण फक्त योगी आदित्यनाथ यांना धक्का लागला नाही. दोन महिन्यानंतर योगी आदित्य युपीचे मुख्यमंत्री असणार नाहीत, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

दरम्यान, एकवेळ असा होता की पाकिस्तान आणि बांगलादेश आपल्याकडून शिकत होते, आता परिस्थिती बदलली आहे. भाजपने मला अटक केली. मनिष सिसोदिया यांना अटक केली. काँग्रेसचे बॅक अकाऊंट फ्रीझ केले. देशातील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पार्टीचं अकाऊंट कसं गोठवलं? देशातील विरोधकांना संपवण्याचं काम भाजपने केलं. असं तर काम कायर करतो. कायर आहेत मोदी.. हिंमत असेल तर डोळ्यात डोळे घालून  निवडणूक लढा, असं खुलं आव्हान अरविंद केजरीवाल यांनी दिलं.