शिवसेना- राष्ट्रवादी 'गृह'कलह, गृहमंत्र्यांच्या 'सॉफ्ट' कारभारावर शिवसेना नाराज?

 गृहखात्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता?

Updated: Apr 1, 2022, 07:40 PM IST
शिवसेना- राष्ट्रवादी 'गृह'कलह, गृहमंत्र्यांच्या 'सॉफ्ट' कारभारावर शिवसेना नाराज? title=

मुंबई : गृहखात्यावरून शिवसेना (Shiv sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या (Dilip Walse patil) कारभारावर शिवसेना तसंच काँग्रेसही (Congress) नाराज असल्याचं समजतं आहे. गृहखातं (Home ministry) शिवसेनेकडं देण्याची भाषा सुरू झाली आहे. गृह खात्यावरून महाविकास आघाडीत काय धुसफूस सुरु असल्याची चर्चा आहे.

शिवसेनेला हवंय गृहमंत्रिपद? 

महाविकास आघाडीत गृहमंत्रिपदावरून संघर्ष पेटला आहे. गृहमंत्र्यांच्या मवाळ कारभारावर केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच (CM Uddhav Thackeray) नाहीत, तर शिवसेनेसह काँग्रेसचे नेतेही नाराज असल्याचं समजतंय. भाजप (BJP) नेत्यांविरोधात पुरावे देऊनही राष्ट्रवादीचे गृहमंत्री वळसे पाटील ठोस कारवाई करत नसल्याची तक्रार शिवसेना-काँग्रेस मंत्र्यांची आहे. राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये छुपा समझौता आहे की काय, अशी शंका घेतली जाते आहे. त्यामुळंच शिवसेनेकडं गृहखातं सोपवण्याची मागणी पुढं येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेनेला का हवंय गृहखातं?

शिवसेना नेत्यांनी भाजप नेत्यांच्या आर्थिक घोटाळ्यांसंदर्भात पुरावे दिले. मात्र गृहमंत्र्यांकडून ठोस कारवाई झाली नाही
पुरावे देऊनही कारवाई होत नसल्यास गृहमंत्रिपद शिवसेनेकडे सोपवा, अशी मागणी पुढं आल्याचं समजतंय.
केंद्रीय यंत्रणाचा वापर करून मविआ नेत्यांना त्रास दिला जातोय..
मात्र पोलीस यंत्रणेचा वापर करताना राष्ट्रवादी हात आखडता घेत असल्याचं बोललं जातंय.
सत्कार समारंभात तलवार हाती घेतली म्हणून काँग्रेस मंत्र्यांवर गुन्हे दाखल झाले.
त्यामुळं काँग्रेसमध्येही नाराजी वाढल्याचं समजतं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ठाकरे- वळसेंमध्ये गृह खात्याच्या कारभारावर तब्बल सव्वा तास चर्चा झाली. त्यामुळं शिवसेना नाराज असल्याच्या बातम्यांना पेव फुटलं. मात्र आधी मुख्यमंत्री कार्यालयानं आणि नंतर वळसे पाटलांनीही नाराजीच्या बातम्यांच खंडन केलं.

गृहखात्याच्या कारभारावर नाराजी नसल्याचं अधिकृतपणं सांगितलं जातंय, पण प्रत्यक्षात पडद्याआड महाविकास आघाडीत गृहखात्यावरून मोठी धुसफूस सुरू असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. वळसे पाटील आता गृहमंत्रिपदाचा किल्ला कसा लढवतायत, यावर पुढची राजकीय गणितं अवलंबून असणार आहेत.