धक्कादायक, केईएम रुग्णालयात भरतोय उघडे बाबाचा दरबार

 मुंबईतल्या एका प्रसिद्ध रुग्णालयात एका बाबाचा खुलेआम दरबार भरतो. तोही गेली ३५ वर्षं.

कृष्णात पाटील | Updated: Oct 5, 2018, 05:30 PM IST
धक्कादायक, केईएम रुग्णालयात भरतोय उघडे बाबाचा दरबार title=
संग्रहित छाया

मुंबई : अतिशय धक्कादायक बातमी आहे. मुंबईतल्या एका प्रसिद्ध रुग्णालयात एका बाबाचा खुलेआम दरबार भरतो. गेली ३५ वर्षं हा उघडे बाबा इथे खुशाल दरबार भरवतोय. पालिकेतील बडे अधिकारी आणि राजकीय नेतेच या बाबाचे भक्त आहेत. त्यांच्याच वरदहस्तानं बिनदुक्कत या उघडे बाबाचं प्रस्थ गेल्या ३५ वर्षांपासून इथे आहे.

मनोहर खंडू साळुंखे. अर्थात मन्या बाबा तथा उघडे बाबा. या बाबानं त्याचा दरबार थाटलाय थेट केईएम रुग्णालयामध्ये. केईएम रुग्णालयात अस्थिव्यंग विभागाच्या मागच्या बाजूला या बाबाचा हा अनधिकृत मठ आहे. या मठातच त्याचा असा दरबार भरलेला असतो. कमरेला केवळ लुंगी लावून हा उघडा बाबा त्याच्या तथाकथित भाविकांना उपदेश देत बसतो. दर गुरुवारी आणि अमावस्या, पोर्णिमेला बाबाच्या अनधिकृत मठात भक्तांची मोठी गर्दी असते, यात मग महापालिका, पोलीस दलातले अधिकारी  ते राजकीय नेत्यांपर्यंत सगळे बाबाचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात...या मठाचे नियमही खूपच कडक आहेत.

सबरीमाला मंदिरात जरी महिलांना प्रवेश मिळाला असला तरी या बाबाच्या मठात मासिक पाळी आलेल्या महिलांना प्रवेश नाही. बाबाचे प्रस्थच तसं मोठं असल्यानं बाबाच्या या अनधिकृत मठावर गेल्या 35 वर्षांत कुठलीही कारवाई झालेली नाही. आमची 'झी 24 तास'ची टीम जेव्हा या उघडे बाबाच्या मठात गेली तेव्हा बाबाची भंबेरी उडाली. बाबांनी कॅमे-यासमोर बोलायला नकार देत आमच्या टीमला अक्षरशः बाहेर हाकललं.

ज्या केईएम रुग्णालयात जागेअभावी रुग्णांवर उपचार होत नाहीत, ज्या परिसरात अनेक रुग्णांना फूटपाथ हाच आसरा आहे, त्याच ठिकाणी हा बाबा मात्र प्रशस्त अशा 1300 चौरस फुटांच्या जागेत अनधिकृत मठ बांधून राहतो. तरीही इतकी वर्षे त्याचं कुणीच काही वाकडं करु शकत नाही आणि त्यामुळंच बाबाची भोंदुगिरी जोरात आहे. 

या बाबानं तीनवेळा म्हणजे 1997, 2015 आणि 2017 मध्ये मठाचे बांधकाम अधिकृत करण्यासाठी तसंच पक्कं बांधकाम करण्यासाठी केईएम रुग्णालय प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. परंतु तिन्हीवेळा परवानगी नाकारण्यात आली. गेल्या वर्षी या अनधिकृत मठावर कारवाई केल्याचंही कागदोपत्री दाखवलं गेलंय. महापालिकेतून उपायुक्त पदावरून निवृत्त झालेल्या एका अधिका-याच्या दबावामुळे बाबाच्या मठावर कारवाई होत नाही.