मुंबईतील सायन उड्डाणपूल दोन महिने बंद राहणार

 सायन उड्डाणपूल दोन महिने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.  

Updated: Mar 29, 2019, 08:01 PM IST
मुंबईतील सायन उड्डाणपूल दोन महिने बंद राहणार title=

मुंबई : शहरातील सायन उड्डाणपूल दोन महिने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील सायन उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम २० एप्रिल २०१९ पासून हाती घेण्यात येणार आहे. साधारणत: दोन महिन्याच्या कालावधीसाठी उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सायन उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट आयआयटी मुंबईमार्फत करण्यात आले होते. त्यांच्या अहवालानंतर या पुलाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे  हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

आयआयटीच्या अहवालात उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार, महामंडळाने निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहतूक नियोजनासाठी मुंबई वाहतूक पोलिसांबरोबर बैठक घेण्यात आली. बेअरिंग बदलण्यात येणार असल्याने तोपर्यंत खबरदारांची उपाययोजना म्हणून उड्डाणपुलावरील जड वाहनांची वाहतूक बंद करण्याबाबत वाहतूक पोलिसांना कळविण्यात आले आहे.

गुरुवारी रात्री सायन उड्डाणपुलाच्या कठड्याच्या बाहेरील भागातून दहा बाय पंधरा सें.मी. भागातील प्लास्टरचा तुकडा खाली पडला होता. याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे. मुख्य उड्डाणपुलाच्या कुठलाही भाग खराब झालेला नाही. एकूण १७० बेअरिंग उड्डाणपुलाला एकूण १७० बेअरिंग असून दोन महिन्याच्या कालावधीत ते पूर्णपणे बदलण्यात येणार आहे. २० एप्रिलपासून प्रत्यक्ष कामाला  सुरुवात होणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. या कालावधीत उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्ण बंद राहणार आहे. वाहनचालकांनी उड्डाणपुलाखालील रस्त्याचा पर्यायी वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.