सत्तासंघर्षानंतर आता शिवसेनेतल्या वर्चस्वासाठी संघर्ष, उद्धव ठाकरेंचे आदेश एकनाथ शिंदेंकडून रद्द

उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टीच्या घेतलेल्या निर्णयांना शिंदे गटाकडून थेट आव्हान  

Updated: Jul 15, 2022, 03:39 PM IST
सत्तासंघर्षानंतर आता शिवसेनेतल्या वर्चस्वासाठी संघर्ष, उद्धव ठाकरेंचे आदेश एकनाथ शिंदेंकडून रद्द title=

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : सत्तासंघर्ष संपल्यानंतर आता शिवसेनेतल्या (Shivsena) वर्चस्वासाठी संघर्ष सुरू झाल्याचं चित्र दिसतंय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी  दिलेले आदेश रद्द करण्याचा सपाटाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावला आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी हकालपट्टी केलेल्या शिंदे गटातल्या विभागप्रमुख, जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिका-यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुन्हा त्याच पदांवर नियुक्ती केलीय.  इतर जिल्ह्यांमधील हकालपट्टीच्या कारवायाही शिंदे रद्द करण्याची शक्यता आहे. 

ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांची शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख या पदावर पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ नरेश म्हस्के यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा. त्यानंतर म्हस्के यांची पदावरुन हकालपट्टी करण्याचे आदेश पक्षप्रमुखांनी दिले. 

पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा ध्वज हाती घेणाऱ्या कट्टर शिवसैनिकांला पदावरून हटविण्याचे अधिकार नाहीत , असं स्पष्ट करत जिल्हाप्रमुखपदी नव्या जोमाने काम करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांना दिले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा ध्वज हाती घेणाऱ्या कट्टर शिवसैनिकांला पदावरून हटविण्याचे अधिकार सामनाला नाहीत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

इतकंच नाही तर आजपर्यंत मनमानी पद्धतीने हकालपट्टी केलेल्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पुन्हा एकदा त्याच पदांवर पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णयही एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.  शिवाय पक्ष विस्ताराचं काम नव्या जोमाने करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.