खार सबवेचं छत कोसळल्याच्या अफवेमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प

पश्चिम रेल्वेकडून अप आणि डाऊन दिशेची वाहतूक तात्काळ थांबविण्यात आली होती.

Updated: Jul 15, 2018, 06:39 PM IST
खार सबवेचं छत कोसळल्याच्या अफवेमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प title=

मुंबई: आतापर्यंत केवळ तांत्रिक बिघाडांमुळे ठप्प होणाऱ्या पश्चिम रेल्वे रविवारी एका वेगळ्याच कारणामुळे ठप्प झाली होती. खार ते सांताक्रुझ या स्थानकांदरम्यानच्या भुयारी मार्गाचे (सब वे) छत कोसळल्याची बातमी दुपारी पाचच्या सुमारास पसरली. मात्र, रेल्वेच्या अभियंत्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ही निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पश्चिम रेल्वेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून लगेचच याबद्दलचे स्पष्टीकरण दिले. 

आम्हाला खार आणि सांताक्रुझ स्थानकांदरम्यानच्या सबवे चे छत कोसळण्याच्या स्थितीत असल्याची माहिती प्रवाशाकडून समजली होती. त्यामुळे पश्चिम रेल्वेकडून अप आणि डाऊन दिशेची वाहतूक तात्काळ थांबविण्यात आली होती.

मात्र, घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर यामध्ये तथ्य नसल्याचे समोर आले. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्ववत झाली आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वीच अंधेरी येथील गोखले पूल रेल्वे ट्रॅकवर कोसळला होता. तेव्हापासून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळेच आज अफवा पसरण्याचा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.