Taxi Service Mumbai : ...तर मुंबईतील टॅक्सीचालकांना होणार शिक्षा; 'नाही' म्हणाल तर RTO शी गाठ

Taxi Service Mumbai : तुम्हीही टॅक्सी प्रवास करताय? टॅक्सीचालक अपेक्षित ठिकाणी सोडण्यास नकार देतोय? मनस्ताप होण्याची वेळ आता कमीच येईल. आधी वाचा ही माहिती...    

सायली पाटील | Updated: Jul 11, 2023, 11:54 AM IST
Taxi Service Mumbai : ...तर मुंबईतील टॅक्सीचालकांना होणार शिक्षा; 'नाही' म्हणाल तर RTO शी गाठ title=
Taxi Service Mumbai Helpline Number issued by rto latest update

Taxi Service Mumbai : फक्त मुंबईत नव्हे, देशातल्या बहुतांश ठिकाणी गेलं असता तिथं काही जवळच्या ठिकाणांवर किंवा शहरांतर्गत प्रवासासाठी खास दळणवळणाच्या साधनांची सोय असते. ठिकठिकाणी असणाऱ्या रिक्षा, हातरिक्षा, टॅक्सी, ओला, उबर हे त्यातेच काही प्रकार. असे एक ना अनेक पर्याय उपलब्ध असूनही ऐन अडीनडीच्याच वेळी यातला एकही पर्याय मदतीला आला नाही असं अनेकांसोबतच झालं असेल. 

मुंबईकरांना तर दर दिवशी याचा प्रत्यय येतो असं म्हणायला हरकत नाही. कारण रेल्वे स्थानकांबाहेर म्हणा किंवा कोणा एका चौकात म्हणा, रांगेत उभे असणारे टॅक्सी चालक अनेकदा आपल्याला अपेक्षित ठिकाणी सोडण्यास स्पष्ट नकार देतात. 

'वहां पे ट्राफिक है...', 'तिथे नाही जात...' असं म्हणत एक ना अनेक कारणं देत बऱ्याचदा ही मंडळी प्रवाशांना नेण्यास नकार देतात. अनेकदा भाडं जवळचं अर्थात कमी अंतरावर सोडायचं असल्यामुळंही हे नकारार्थी उत्तर मिळतं. अशा वेळी प्रवासी म्हणून टॅक्सीपुढे असणारे तुम्हीआम्ही इतके हतबल होतो की विचारून सोय नाही. आता मात्र या अशा टॅक्सीचालकांना थेट आरटीओचीच भीती असणार आहे.

RTO करणार तुमची मदत... 

टॅक्सीचालकांचा मुजोरपणा मोडित काढण्यासाठी थेट वाहतुक शाखाच नागरिकांची मदत करणार आहे. कारण, आता जास्त पैसे मागणाऱ्या आणि सतत भाडं नाकारणाऱ्या टॅक्सीचालकांवर आरटीओकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी प्राथमिक स्तरावर Helpline Number आणि ईमेलसुद्धा जारी करण्यात आला आहे. ज्याअंतर्गत 1800-220-110 आणि 9152240303 या क्रमांकांवर प्रवासी तक्रारी दाखल करू शकतात. तर, mh03autotaxicomplaint@gmail.com या इमेल आयडीवर मेल करतही ते ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतात. 

हेसुद्धा वाचा : कसं तपासाल Income Tax Refund स्टेटस? पाहा सविस्तर माहिती 

दंडात्मक कारवाईला सामोरं जाण्यासाठी तयार राहा!

रिक्षा आणि टॅक्सीचालकांकडून बऱ्याचदा जास्त भाडं आकारलं जातं. याचा जाब विचारला असता त्यांच्याकडून अनेकदा उडवाउडवीची उत्तरं मिळतात. सरतेशेवटी वाद विकोपास गेला तरीही जास्तीचं भाडं देऊन प्रवाशांनाच माघार घ्यावी लागते. आता मात्र या प्रकरणांवर चाप बसेल. शिवाय सातत्यानं भाडं नाकारणाऱ्या रिक्षा- टॅक्सी चालकांवरही आता आरटीओ दंडात्मक कारवाई करत त्यांचे परवाने रद्द करताना दिसणार आहे.