रामनाथ कोविंद मातोश्रीवर जाणार?

एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद येत्या शनिवारी मुंबईत येणार आहेत.

Updated: Jul 12, 2017, 11:29 PM IST
रामनाथ कोविंद मातोश्रीवर जाणार?  title=

मुंबई : एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद येत्या शनिवारी मुंबईत येणार आहेत. कोविंद यांच्या उपस्थितीत मरीन लाईन्समधल्या गरवारे क्लबमध्ये एक कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, भाजपचे आमदार, खासदार आणि एनडीएमधले प्रतिनिधींचा या कार्यक्रमात सहभाग असणार आहे.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक 17 जुलैला होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रामनाथ कोविंद यांचा हा मुंबई दौरा असणार आहे. साधारणपणे राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणारे उमेदवार मातोश्रीवर जातात. मात्र रामनाथ कोविंद शनिवारी मातोश्रीवर जाणार का, याची उत्सुकता आहे.

रामनाथ कोविंद यांनी मातोश्रीवर यावं का हा त्यांचा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेनं दिलीय. प्रणव मुखर्जी मातोश्रीवर आले होते, त्यावेळी शिवसेना एनडीएमध्ये असूनही युपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जींना पाठिंबा दिला होता. पण यावेळची परिस्थिती वेगळी आहे. शिवसेनेनं एनडीएच्या उमेदवारालाच पाठिंबा दिलाय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आधीच मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांना भेटून गेलेत असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.