उत्तर प्रदेशच्या राजकीय क्षितिजावर उगवता तारा

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या घमासान लढाईत समाजवादी पक्षाने बहुमत प्राप्त केलं. यावेळेस काँग्रेसच्या सर्व राहुल गांधींवर पक्षाची भिस्त होती तर अखिलेश यादव समाजवादी पक्षाची धुरा सांभाळत होता. राहुल गांधींनी तब्बल २०० प्रचार सभा घेतल्या पण पदरी निराशाच आली. उत्तर प्रदेश सारख्या क्षेत्रफळाने अवाढ्य असलेल्या राज्यात मृतप्राय असलेल्या काँग्रेसला संजीवनी देणं हे तितकसं सोपं नाही.

Updated: Mar 7, 2012, 12:09 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या घमासान लढाईत समाजवादी पक्षाने बहुमत प्राप्त केलं. यावेळेस काँग्रेसच्या सर्व राहुल गांधींवर पक्षाची भिस्त होती तर अखिलेश यादव समाजवादी पक्षाची धुरा सांभाळत होता. राहुल गांधींनी तब्बल  २०० प्रचार सभा घेतल्या पण पदरी निराशाच आली. उत्तर प्रदेश सारख्या क्षेत्रफळाने अवाढ्य असलेल्या राज्यात मृतप्राय असलेल्या काँग्रेसला संजीवनी देणं हे तितकसं सोपं नाही.

 

राहुल गांधींना संघटना बांधणीचे कौशल्य आत्मसात करता आलेलं नाही हेच यावरुन दिसून येतं. त्या उलट अखिलेश यादव यांनी मागच्या निवडणुकीतल्या पराभवाची आठवण ठेवत अचूक व्युहरचना केली. अखिलेश यादव यांनी मैसुरच्या जयचामराजेंद्र महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे तर सिडनी विद्यापीठातून व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास पूर्ण केला आहे.

 

अखिलेश यादवांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना उमेदवारी नाकारली त्यात कुख्यात डी.पी.यादवांचाही समावेश आहे. यावेळेस पाच वर्षापूर्वी पेक्षा १८ टक्के अधिक महिला मतदारांनी मतदार होते त्यांना अखिलेश यादवांच्या रुपाने पक्षाचा नवा चेहरा समोर आला. अखिलेश यादवांची मुळं उत्तर प्रदेशच्या मातीत घट्ट रुजली आहेत त्यामुळ लोकांशी सहज संवाद साधणं त्यांना सोपं गेलं.

 

राहुल गांधींनी जरी दलित वस्ती आणि घरांना भेटी दिल्या असल्या तरी ते काहीसे अलिप्तच भासतात. अखिलेश यादवांनी सर्वसामान्यांशी स्वत:ला जोडून घेतलं, त्या उलट राहुल गांधींना ते नातं जोडता आलं नाही. अखिलेश यादवांनी मतदारांना विश्वास दिला की समाजवादी पक्षाचे सरकार आलं तर कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल.

 

अखिलेश यादवांनी पक्षाची नवी प्रतिमा जनतेच्या मनात रुजवली. समाजवादी पक्षाची मजबुत पक्षसंघटनेचा लाभही अखिलेश यादवांना करुन घेता आला. सर्वात महत्वाचं अखिलेश यादवांना उत्तर प्रदेशातील जात वास्तवाचं भान होतं. राहुल गांधींच्या दुर्दैवाने त्यांचे सल्लागारही राज्याबाहेरचे होते. राहुल गांधींना गांधी घराण्याच्या वलयामुळे लोकांमध्ये मिसळायला अनेक मर्यादा येतात तर दुसरीकडे अखिलेश यादवांना सर्वसामान्य सारखं राहण्याचं स्वातंत्र्य आहे.

एकीकडे अखिलेश यादव हे लोकांना आपल्यातले एक वाटायला लागले तर दुसरीकडे राहुल गांधींना ते शक्य झालं नाही. अखिलेख यादवांनी आपल्या भाषणात नैसर्गिक संवाद आणि हजरजबाबीपणावर भर दिला तर राहुल गांधींची भाषणे कृत्रिम भासायची.  अखेरीस अखिलेश यादव यांनी बाजी मारली पण अजुनही राहुल गांधींसाठी  वेळ गेलेली नाही.