पवारांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री दिल्ली दरबारी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज दिल्लीदरबारी दाखल झाले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची त्यांनी भेट घेतली. दहा जनपथवर सोनिया गांधींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली. त्यांच्यावर शरद पवारांनी टीका केली होती.

Updated: Jul 30, 2012, 04:44 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

राष्ट्रवादीचं नाराजीनाट्य, मुख्यमंत्र्यावर थेट हल्लाबोल आणि खुद्द काँग्रेसमधील आमदारांचा नाराजीचा पाढा या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज दिल्लीदरबारी दाखल झाले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची त्यांनी भेट घेतली. दहा जनपथवर सोनिया गांधींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली.

 

मुख्यमंत्र्यांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यातच असलं तरी भेटीत समन्वय समितीबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. शुक्रवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी राहुल गांधींची भेट घेतली होती. त्यानंतर लगेचच तीन दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी श्रेष्ठींची भेट घेतलीय. तर सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या शरद पवारांच्या मागणीनुसार केंद्रात आणि राज्यात समन्वय समितीची स्थापना करण्याचं आश्वासन सोनिया गांधी आणि पंतप्रधानांनी दिलं होतं. त्यामुळं या समितीच्या स्थापनेबाबत चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 

दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटण्यापूर्वीही मुंबईत मुख्यमंत्र्यांनी लवकर निर्णय होत नसल्याचे आरोप फेटाळून लावले होते.. यावेळी फायलींच्या निपटा-याची आकडेवारी देत त्यांनी, आपल्याच कारकीर्दीत जास्तीत जास्त फाईलींचा निपटारा झाल्याचे स्परमाण दाखवून दिले होते. यानिमित्तानं राष्ट्रवादीवर कुरघोडी करतानाच, काँग्रेसच्याच माजी मुख्यमंत्र्यांपेक्षा आपण कसे सक्षम आहोत, हे दाखवण्याचाही मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न राहिला.

 

मुख्यमंत्र्यांविरोधात काही काँग्रेस आमदारांनी मोहीम उघडली होती, यात विलासराव आणि अशोक चव्हाण यांचे समर्थक मोठ्या संख्येनं होते, त्यामुळेच या दोन्ही नेत्यांना लक्ष करुन मुख्यमंत्र्यांनी आपला हिशेब चुकता केल्याचं बोललं जातय.