ममतांची नाराजी हे केवळ निमित्त आहे का?

रेल्वे अर्थसंकल्पातील भाडेवाढीने तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी संतप्त झाल्याचं वृत्त असलं तरी त्यामागे दुसरं काही कारण आहे का?

Updated: Mar 14, 2012, 04:09 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

रेल्वे अर्थसंकल्पातील भाडेवाढीने तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी संतप्त झाल्याचं वृत्त असलं तरी त्यामागे दुसरं काही कारण आहे का?

 

नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांनंतर काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. उत्तर प्रदेशात पानीपत, गोवा आणि पंजाबमध्ये विजय खेचून आणता आला नाही तर उत्तराखंडमध्ये दैव देतं आणि कर्म नेतं अशी अवस्था होऊ शकते. काँग्रेसला पराभवामुळे बॅकफूटवर जावं लागलं आहे.

 

देशभरात परत एकदा काँग्रेसला पर्याय ठरु शकेल अशा तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेच्या चर्चांना जोर आला आहे. आणि अशा वेळेस ममता बॅनर्जींनी रेल्वे अर्थसंकल्पाचे निमित्त करत काँग्रेसला कोंडीत पकडणं यामागे भविष्यातील नव्या समीकरणांची जुळवाजुळव असू शकते. उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांची अवस्था वाईट झाल्याने प्रादेशिक पक्षांच्या महत्वाकांक्षेने उचल खाल्यास नवल वाटायला नको. याआधीही अठरापगड पक्षांची मोट बांधून सरकार स्थापण्याचे प्रयत्न झाले आहेत.

 

ममता बॅनर्जींचा स्वभाव हट्टी असल्याने त्यांनी यापूर्वीही काँग्रेसला नमवलं आहे. पण यावेळेस काँग्रेसला भाडेवाढ मागे घेणं कितपत शक्य होईल हा यक्षप्रश्न आहे. तसंच भाडेवाढ मागे घेतल्यास काँग्रेसची नाचक्की होईल ती वेगळीच. तसंच भाडेवाढ मागे घेण्यामुळे काँग्रेस खिंडीत सापडली असा विरोधी पक्षांचा समज होणं हे पक्षाला राजकीय दृष्ट्या परवडण्यासारखं नाही.