सारीपाट हा राष्ट्रपतीपदाचा...

दिल्लीत रायसिना हिल्सच्या खेळाचा सारीपाट मांडलाय. मुखर्जी, कलाम की आणखी कोणी... क्षणाक्षणाला खेळाची बाजी पालटतेय... हा सारीपाट हलवतायत ते राजकारणातले तीन एक्के... ममता बॅनर्जी, प्रणव मुखर्जी आणि मुलायम सिंग यादव...

Updated: Jun 15, 2012, 09:34 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

दिल्लीत रायसिना हिल्सच्या खेळाचा सारीपाट मांडलाय. मुखर्जी, कलाम की आणखी कोणी... क्षणाक्षणाला खेळाची बाजी पालटतेय... हा सारीपाट हलवतायत ते राजकारणातले तीन एक्के... ममता बॅनर्जी, प्रणव मुखर्जी आणि मुलायम सिंग यादव... तिघंही राजकीय चाली खेळता खेळता स्वतःच त्या खेळात अडकलेत आणि त्यातूनही त्यांनी राजकीय फायद्याची गणितंही सोडवायला घेतलीत.

.

ममता बॅनर्जींनी तर एकाच दगडात अनेक पक्षी मारले. बंगालसाठी दिल्लीच्या तख्तापुढे झुकायचं नाही, हे दाखवतानाच राष्ट्रपतीपदासाठी पंतप्रधानांचंच नाव घेत ममतांनी असे काही फासे फेकले की त्यातून सावरण्यासाठी काँग्रेसला तब्बल एक दिवस लागला. मग मुलायम सिंग यांच्याबरोबर भेटीगाठी करत राजकारणातल्या नव्या युतीचे संकेतही मोठ्या हुशारीनं दिले. त्याचवेळी प्रणव मुखर्जींच्या नावाला विरोध करत राजकारणातली आपली ताकदही ममतांनी दाखवून दिली. डॉ. ए. पी. जे अब्दुल कलामांच्या नावाचा आग्रह धरुन चुटकीसरशी एनडीएशी संबंध जोडले आणि दिल्लीतल्या गरमागरम घडामोडींच्या केंद्रस्थानी स्वतःला आणून ठेवलं.

.

दुसरा महत्त्वाचा एक्का म्हणजे मुलायम सिंह... मुलायम सिंहांनी अतिशय हुशारीनं ममता बॅनर्जींना या खेळातलं प्यादं बनवलं आणि हेच प्यादं वजीर कसं होतं, तेही दाखवून दिलं. या सगळ्या खेळाचा लगाम मुलायम सिंगांनी ममतांना पुढे करुन आपल्याच हातात ठेवला. त्याचवेळी युपीए आणि एनडीएबरोबरच तिसरा पर्याय म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करायला ते विसरले नाहीत.

.

तिसरा एक्का आहेत प्रणव मुखर्जी... ममता आणि मुलायम सिंह यांच्या या राजकारणानं प्रणवदांना चांगलाच धक्का दिला. बंगालपासून ते १० जनपथपर्यंत प्रणवदा म्हणजे एक भरवसा होता ज्याच्या मदतीनं काँग्रेसलाही हव्या तशा सोंगट्या हलवता येतील आणि सहमतीही होईल. प्रणव मुखर्जींना आधी १० जनपथचं मान्यता प्रमाणपत्र हवं होतं, जे त्यांना अजूनही मिळालेलं नाही. ममताच्या खेळामध्ये काँग्रेसनं एकजूट दाखवली. पण, प्रणव मुखर्जींबद्दल काँग्रेसनं एकही शब्द काढला नाही.

.

रायसिना हिल्सच्या या सारीपाटात ममता आणि मुलायम सिंहांनी सोनिया गांधींना शह देण्याची रणनिती आखली होती. पण त्यामध्ये प्रणव मुखर्जींना मात मिळणार आहे. कारण राजकारणातले हे तीन एक्के समझून चुकलेत की तिघांनाही झुकावं लागणारच. आता हुकुमाचा एक्का कोण ठरतो ते पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

.