www.24taas.com, रत्नागिरी
प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस जगबुडी नदीत कोसळून भीषण दुर्घटना घडलीय. या अपघातात ३७ जण ठार झालेत तर १५ जण गंभीर जखमी आहेत. दरम्यान, पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलंय.
मंगळवारी पहाटे ३.३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडलाय. गोव्याकडून मुंबईकडे निघालेली महाकाली ट्रॅव्हल्सची बस जगबुडी नदीत कोसळली आणि एकच आकांत झाला. प्रवाशांनी भरलेली ही बस १५० फूट उंचीवरून खाली नदीत कोसळली. पुलाच्या उजव्या बाजूचा कठडा तोडून ही बस नदीत कोसळली. पहाटेच्या गाढ निद्रेत असणाऱ्या बेसावध प्रवाशांना सावध होण्याची संधीही मिळाली नाही. मुंबई-गोवा महामार्गावर खेड भरणा नाक्याजवळ ही दुर्घटना घडलीय.
जखमी बोलण्याच्या स्थितीत नाहीत त्यामुळे अजूनही जखमींची नावं प्रशासनाला समजू शकलेली नाहीत. या बसमध्ये नेमके किती प्रवासी होते हे नेमकं सांगता येत नसल्यानं अजूनही किती प्रवासी बसमध्ये अडकलेत हेही प्रशासनाला सांगता येत नाहीय. त्यामुळे जखमी आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्यानं प्रशासनाचीही एकच धावपळ उडाली.
दरम्यान क्रेनच्या मदतीने बचाव आणि मदतकार्य सुरु आहे... जखमींना तातडीनं ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलंय. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातामुळे महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झालाय. अवजड वाहनांना काही काळासाठी थांबवण्यात आलंय.