निवडणूक आयोगाची भीती कमी ?

आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते आणि राज्यमंत्री गावीत यांनी केलेल्या आचारसंहिता उल्लंघनाची अजून निवडणूक आयोग चौकशी करत आहे. दीड आठवडा उलटूनही निवडणूक आयोगाची स्वतःची निरीक्षण यंत्रणा राबवण्यात आली नसल्यानं नाशिकमध्ये राजकारण्यांचा रामभरोसे कारभार सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

Updated: Jan 12, 2012, 09:16 PM IST

www.24taas.com,  नाशिक

आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते आणि राज्यमंत्री गावीत यांनी केलेल्या आचारसंहिता उल्लंघनाची अजून निवडणूक आयोग चौकशी करत आहे. दीड आठवडा उलटूनही निवडणूक आयोगाची स्वतःची निरीक्षण यंत्रणा  राबवण्यात आली नसल्यानं नाशिकमध्ये राजकारण्यांचा रामभरोसे कारभार सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर बबनराव पाचपुतेंच्या भाषणातला घोषणांचा पाऊस पाडला. सध्या निवडणूक आयोगाची याबाबतची चौकशी सुरू आहे. पण या कार्यक्रमावेळी निवडणूक आयोगाचा ना  निरीक्षक उपस्थित होता ना व्हिडिओ कॅमेरा. या प्रकरणाची शिवसेनेनं तक्रार केल्यावर आता या प्रकरणाचा अहवाल आदिवासी आयुक्तांकडून मागवण्यात आला आहे.

सध्या या अहवालावर खल सुरू असला तरी तो विभागाच्या मंत्र्यांविरोधात कसा असू शकेल, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. आदिवासी आयुक्तांच्या खांद्यावर बंदुक ठेवून निवडणूक अधिकारी नामानिराळे राहत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. तरीही व्हिडिओ कॅमेरे तैनात नसल्याचं निवडणूक आयोगानंच मान्य केलं आहे. याचा फायदा सत्ताधारी आणि बडे नेते घेत आहेत. त्यामुळे शहरात आचारसंहिता लागूनही निवडणूक आयोगाची भीती आणि शिस्त कमी झाल्याचं चित्र आहे.