‘तपास सुरू आहे...’ दॅटस् इट!

राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसंच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणांच्या प्रमुखांची बैठक घेतली. त्यानंतर दोघांनीही सारखीच प्रतिक्रिया दिलीय... दोघंही म्हणाले ‘अधिक काही बोलता येणार नाही, तपास सुरु आहे...’

Updated: Aug 5, 2012, 03:54 PM IST

www.24taas.com, पुणे

पुण्यातल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या तपासामध्ये तिसऱ्या दिवशीही फारशी प्रगती नाहीये. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसंच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणांच्या प्रमुखांची बैठक घेतली. त्यानंतर दोघांनीही सारखीच प्रतिक्रिया दिलीय... दोघंही म्हणाले ‘अधिक काही बोलता येणार नाही, तपास सुरु आहे...’

 

पुणे शहर पोलीस, महाराष्ट्र एटीएस, एनआयए  अशा विविध स्तरांवर पुण्यातल्या साखळी बॉम्बस्फोटाचा तपास सुरु आहे. या तपासाची माहिती घेण्यासाठी तसंच तपास यंत्रणांना योग्य त्या सूचना देण्यासाठी मुखमंत्री पुण्यात आले होते. शासकीय विश्रामगृहावर सुमारे तासभर चाललेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशीन संवाद साधला. या प्रकरणासंबंधी कुठल्याही ठोस निष्कर्षापर्यंत आपण पोचलेलो नाही. मात्र, हा बॉम्बस्फोट कोणी आणि कुठल्या उद्देशाने घडवला? याचा शोध घेण्याचे कसोशीने प्रयंत्न सुरु असल्याचं त्यांनी सांगितलंय. तपासातील प्रगती योग्य वेळी सांगितली जाईल, असं सांगत त्यांनी याविषयी अधिक बोलण्याचं टाळलं. मुख्यामंत्र्यापाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदेही पुण्यात आले. त्यांनी पोलीस आयुक्तालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. हे बॉम्बस्फोट कमी क्षमतेचे असले आणि त्यात फारशी हानी झाली नसली तरी त्याकडे सरकार अतिशय गांभीर्याने बघत असल्याचे त्यांनी सांगितले. आजघडीला तपासाबाबत अधिक बोलणे उचित ठरणार नाही. मात्र,  या घटनेची पाळंमुळं शोधून काढणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

 

.