झहीर-हॅडिनमध्ये जुंपली

ऑस्ट्रेलियन विकेटकीपर ब्रॅड हॅडिनने भारतीय टीमवर निशाणा साधताना, मॅचमध्ये परिस्थिती भारताच्या हाताबाहेर गेली तर भारतीय टीम बिथरते असा थेट आरोपच केला.

Updated: Jan 11, 2012, 09:44 PM IST

www.24taas.com, पर्थ

 

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिज म्हणजे दोन्ही टीम्सकरता प्रतिष्ठेची लढाई आहे. ही लढाई जितक्या त्वेषाने प्रत्यक्ष मैदानावर लढली जाते, तितक्याच त्वेषाने ती मैदानाबाहेर वाग्युद्धामुळे रंगते. सध्या असंच वाग्युद्ध रंगलं आहे, ते भारतीय फास्ट बॉलर झहीर खान आणि ऑसी विकेटकीपर ब्रॅड हॅडिन यांच्यामध्ये.

 

टीम इंडियाविरूद्ध मेलबर्न पाठोपाठ सिडनी टेस्टमध्ये दणदणीत विजयाची नोंद करणारी ऑस्ट्रेलियन टीम, पर्थवर होणारी तिसरी टेस्ट जिंकून सीरिज नावावर करण्यासाठी 'जी जाँन से' मेहनत करताना दिसत आहे. त्याकरता मैदानाबरोबर मैदानाबाहेरही ऑसीजनं टीम इंडियाविरुद्ध आघाडी उघडली आहे. जसजशी पर्थ टेस्ट जवळ येतेय तसंतसं दोन्ही टीम्समधील प्लेअर्स प्रत्यक्ष मैदानात भेटण्यापुर्वी आपल्या वाक्युद्धाने एकमेकांचं मानसिक खच्चीकरण करण्यात गुंतलेले दिसत आहेत.

 

 

ऑस्ट्रेलियन विकेटकीपर ब्रॅड हॅडिनने भारतीय टीमवर निशाणा साधताना, मॅचमध्ये परिस्थिती भारताच्या हाताबाहेर गेली तर भारतीय टीम बिथरते असा थेट आरोपच केला.  प्रतिकूल परिस्थितीत भारतीय प्लेअर्स लगेच दबावात येतात. जगातील इतर टीम्सच्या तुलनेत टीम इंडिया फारच लवकर पराभव स्वीकारते असा त्याचा आरोप आहे.

 

मेलबर्न आणि सिडनी टेस्ट गमावलेल्या टीम इंडियापुढे आता पर्थ टेस्ट जिंकून सीरिजमध्ये परतण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे मैदानातील आणि मैदानाबाहेरील ऑस्ट्रेलियन्सच्या कोणत्याही डावपेचांना बळी पडायचं नाही असं भारतीय टीमने ठरवलेलं दिसत आहे. त्यामुळेच भारतीय फास्ट बॉलर झहीर खानने कांगारूंवर पलटवार केला आहे.“ऑस्ट्रेलियन बॅटिंगमध्ये अनेक कच्चे दुवे आहेत. ऑस्ट्रेलियन टीमला आम्ही अनेकदा अडचणीत आणलं, पण त्यातून निसटण्याची संधीही दिली. दबावात ऑसी टीम कधीही कोसळू शकते.” असं झहीर म्हणाला.

 

सीरिजमध्ये २-० ने आघाडीवर असणारी ऑस्ट्रेलियन टीम पर्थ जिंकून आपला वरचष्मा असल्याचं दाखवून देण्यास उत्सुक आहे. तर  भारतीय टीमही आता सीरिजमध्ये कमबॅक करण्याकरता असणाऱ्या प्रत्येक संधीचा फायदा उचलण्यासाठी तयार झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मैदानात भिडण्यापूर्वी दोन्ही टीम्स आमने सामने आल्या आहेत.दोन्ही टीम्सचं उद्दिष्ट एकच की मैदानात असो अथवा मैदानाबाहेर, एकमेकांवर कुरघोडी करत जिंकायचंच.