हैदराबाद स्फोट : अफजल गुरुच्या फाशीचा बदला

संसद हल्ल्याचा सूत्रधार अजफज गुरुच्या फाशीचा बदला घेण्यासाठी हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणल्याची माहिती समोर येतेय. या बॉम्बस्फोटांचा कट सीमेपलिकडे पाकिस्तानात रचला गेल्याचीही सूत्रांनी माहिती दिलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 22, 2013, 10:11 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
संसद हल्ल्याचा सूत्रधार अजफज गुरुच्या फाशीचा बदला घेण्यासाठी हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणल्याची माहिती समोर येतेय. या बॉम्बस्फोटांचा कट सीमेपलिकडे पाकिस्तानात रचला गेल्याचीही सूत्रांनी माहिती दिलीय. गुप्तचर खात्यानं याबाबत सुरक्षा यंत्रणांना माहिती दिली होती. लष्कर ए तोएबा, हुजी आणि हिजबुल मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटना या बॉम्बस्फोटांमाग असल्याचा संशय आहे.
संसद हल्ला प्रकरणातला दोषी अफजल गुरु याच्या फाशीनंतर अतिरेकी संघटनांची पाकिस्तानात एक बैठक झाली होती. त्यानंतर भारतातल्या गुप्तचर यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला होता. अफजलच्या फाशीनंतर पाकिस्तानात ‘युनायटेड जेहाद काऊन्सिल’नं या घटनेचा बदला घेण्याचा निर्णय घेतला होता, असंही म्हटलं जातंय.

‘भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट रचला जातोय... बॉम्बस्फोट होऊ शकतात, अशी माहिती दोन दिवसांपूर्वीच मिळाली होती’ असं गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी माहिती दिली होती. अफजल गुरुला फासावर चढवल्यानंतर दहशतवादी संघटनांनी या घटनेचा बदला घेणार असल्याचं जाहीरपणे सांगितलं होतं. गुप्तचर यंत्रणांनी काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनांकडून पाठवण्यात आलेले अनेक संदेशही रेकॉर्ड केलेत. ज्यामध्ये अफजल गुरुच्या फाशीचा बदला घेण्याचाही उल्लेख करण्यात आला होता.