'...हे माझं दुर्देव' - लतादीदी

Last Updated: Wednesday, June 13, 2012 - 16:19

www.24taas.com, नवी दिल्ली

 

‘मेहदी हसन जेव्हा स्वस्थ होते आणि गात होते तेव्हा मी त्यांच्यासोबत गाऊ शकले नाही, हे माझंच दुर्देव आहे’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी. मेहदी हसन यांच्या निधनाची बातमी ऐकल्यावर त्यांचा स्वर दु:खी झाला.

 

लता मंगेशकर आणि मेहदी हसन यांना एकही गाणं एकत्र गाण्याची संधी मात्र मिळाली नाही. आजारी असताना भारतात येऊन लता दीदींना भेटण्याची इच्छा मेहदी हसन यांचीही इच्छा होती. मात्र, ही इच्छा आता कधीही पूर्ण होणार नाही. एक महान गायक आपल्यातून निघून गेल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय.

 

८० च्या दशकात फुफ्फुसाच्या आजारामुळं मेहदी हसन यांना गाण्यापासून दूर व्हावं लागलं होतं. २०१० मध्ये ‘एचएमव्ही’नं त्यांचा ‘सरहदें’ हा अल्बम प्रदर्शित केला. त्यामध्ये ‘तेरा मीलन’ या लता दीदी आणि मेहदी हसन यांच्या एकमात्र युगूल गीताचा समावेश होता. हसन यांनी स्वत: हे गीत लिहिलं होतं आणि २००९ साली पाकिस्तानात या गाण्याचं रेकॉर्डिंग केलं. लता दीदी यांनी गायलेला भाग मात्र २०१० साली भारतात रेकॉर्ड करण्यात आला. आणि त्यानंतर एक युगूल गीत म्हणून ते प्रेक्षकांसमोर आलं. जेव्हा हे गीत प्रदर्शित झालं तेव्हाही हसन यांची प्रकृती खूपच ढासळलेली होती. त्यांनी हे गाणं ऐकलं मात्र ते काही कळण्याच्या स्थितीत नव्हते, असं लता दीदी यांनी सांगितलं. मागच्या वर्षी जगजीत सिंह आणि आता हसन यांच्या जाण्यानं गझल सुनी-सुनी झाल्याचं लता दीदींनी म्हटलंय.

 

.

First Published: Wednesday, June 13, 2012 - 16:19
comments powered by Disqus