शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक

उस्मानाबादमध्ये शेतक-यांच्या संतापाचा उद्रेक झालाय. शासकीय चारा छावणी बंद झाल्यानं संतप्त शेतक-यांनी रास्तारोको आंदोलन केलं..

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 16, 2013, 07:29 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, उस्मानाबाद
उस्मानाबादमध्ये शेतक-यांच्या संतापाचा उद्रेक झालाय. शासकीय चारा छावणी बंद झाल्यानं संतप्त शेतक-यांनी रास्तारोको आंदोलन केलं.. पाथरुड-बार्शी रस्त्यावर शेतक-यांनी हे आंदोलन केलं. शेतक-यांनी गुरं रस्त्यावर सोडली. गुरं न्यायची तरी कुठे असा संतप्त सवाल शेतक-यांनी केलाय.
उस्मानाबादमधल्या भूम तालुक्यातल्या वालवड-पाठसंगावी इथं गेल्या तीन महिन्यांपासून जनावरांसाठी चारा छावणी सुरूय. त्यात जवळपास एक हजार जनावरं आहेत. आजपर्यंत या छावणीवर 30 लाख 88 हजार रुपये खर्च झालाय. पण गेल्या 15 दिवसांपासून छावणीतल्या गुरांना चाराच मिळालेला नाही. त्यातच चारा-पाण्याअभावी एका दुभत्या गायीचा मृत्यू झाला. त्यामुळं शेतक-यांच्या संतापाचा उद्रेक झाला. आणि त्यांनी पाथरुड-बार्शी रस्त्यावर गुरं बांधून आंदोलन केलं.
दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण २२ छावण्या असून १९ हजार जनावरांसाठी, आत्तापर्यंत ५ कोटी ८५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आलाय. चारा छावणीतल्या भ्रष्टाचाराची वारंवार तक्रार करूनही प्रशासनानं याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचं उघड झालंय. त्यामुळं छावणीतल्या जनावरांना त्वरित चारा-पाणी न मिळाल्यास आंदोलन आणखी भडकण्याची चिन्ह आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.