कामधंदे नसणाऱ्यांचे हे धंदे - राऊत

बाळासाहेबांच्या स्मारकाला कुणाचाही विरोध नाही, असा दावा करतानाच या शिवाजी पार्कवर स्मारकाला विरोध करणाऱ्या संस्थांना काही कामधंदा नसल्याचं वक्तव्यं शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 20, 2012, 05:21 PM IST

www.24taas.com, मुंबई
शिवाजी पार्कवर अर्थात शिवतीर्थावर बाळासाहेबांचं स्मारक बांधणारच, असा चंगच शिवसेनेनं बांधलेला दिसतोय. बाळासाहेबांच्या स्मारकाला कुणाचाही विरोध नाही, असा दावा करतानाच या शिवाजी पार्कवर स्मारकाला विरोध करणाऱ्या संस्थांना काही कामधंदा नसल्याचं वक्तव्यं शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केलंय.
शिवसेनाप्रमुखांचं कर्मस्थळ राहिलेल्या शिवाजी पार्कवरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता याच ठिकाणी शिवसेनाप्रमुखांचं स्मारक उभारलं जावं अशी सेनेची आणि शिवसैनिकांची इच्छा आहे. त्यासाठी लागणारे सोपस्कारही सुरू झालेत. पण, शिवाजी पार्कच्या मैदानावर आणखी एक स्मारक उभारण्याला स्थानिक रहिवाश्यांनी आणि काही एनजीओंनी विरोध केलाय.
यासंबंधी शिवसेनेचे प्रवक्ते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना प्रश्न विचारला गेला असता, ‘ज्या एनजीओ... लंगड्या, अपंग वगैरे संस्था असतील त्यांना काही काम नाही. शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुखांचं स्मारक होणारच’ असं वक्तव्य केलंय. सोबतच ‘स्मारकासंदर्भात शिवसैनिकांची इच्छा आणि शिवसेनाप्रमुख यांच्या आड मी येणार नाही, असं निवेदनही आता उद्धव ठाकरे यांनी दिल्या’चं राऊत यांनी म्हटलंय.
शिवसेनेनं स्मारकाबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानं शिवसेना विरुद्ध स्मारकविरोधी असा सामना रंगण्याची शक्यता आहे.