सत्तासुंदरी ते विषकन्या

कडक उन्हात एक-एक घराचा उंबरा झिजवल्यावर, कर्तृत्वाने आणि नशीबाने कुठेतरी सत्तेपर्यंत पोहोचता येते, ही सत्ता म्हणजे सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी त्यांचं दु:ख कमी करण्यासाठी.

Updated: May 21, 2014, 07:10 PM IST

www.24taas.com, जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई
कडक उन्हात एक-एक घराचा उंबरा झिजवल्यावर, कर्तृत्वाने आणि नशीबाने कुठेतरी सत्तेपर्यंत पोहोचता येते, ही सत्ता म्हणजे सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी त्यांचं दु:ख कमी करण्यासाठी.
तेव्हा महत्वांकांक्षा असते फक्त आपल्या गावाचा, तालुक्याचा आणि जिल्ह्याचा आणि राज्याचा विकास व्हावा. मात्र मुंबई आणि दिल्लीत गेल्यावर सत्तेची नशा अशी काय चढते की बस्स...!
सत्ताधारी नेत्यांना मुंबईत मंत्रालयात गेल्यावर दिसते, ती फक्त सत्तासुंदरी, ही सत्ता सुंदरी म्हणजे त्यांच्यासाठी एक परी. या सत्तासुंदरीच्या परीला पाहुन, ते विसरतात, सर्व सामान्यांनी ईव्हीएम मशीनला `परीस्पर्श` केलाय, तेव्हा आपल्या `उनाड` आयुष्याचं `सोनं` झालंय.
मुंबईच्या समुद्र किनारी दिसणारे रात्रीचे रंगीत दिवे, विशाल आणि दिमाखात उभे असलेले ब्रिटीशकालीन बंगले, हे झपकन डोळ्यासमोरून जावं, तसं सरकारी लाल दिव्याच्या मोटारीत गरगर फिरून सत्ताधाऱ्यांना सत्तासुंदरीचं रूपडं दिसतं.
मंत्र्यांच्या बंगल्यात काश्मीरी नक्षीकाम केलेले सुंदर गालीचे, नोकर चाकर, वातानुकूलित हॉल, ज्यांची कुणाशी ओळख नाही, मात्र कामाची आस आहे, असे ताटकळत बसलेले सामान्य नागरिक, आणि त्यांचे दोन्ही हातांनी होत असलेले नमस्कार, ही रेलचेल पाहून, लोकशाहीला सत्ताधारी विसरतात आणि राजेशाहीत स्वत:ला हरवून बसतात.
दुसऱ्यांची काम कमिशनवर घेऊन आलेला स्टँडर्ड क्लास, म्हणजे कडक इस्त्री आणि पांढरे कपडे, गळ्यातील जाडजूड सोन साखळ्या हाच आपला `कार्यकर्ता`, हाच आपला सत्तेचा खरा दुत, या नशेत सत्ताधारी असतात, पण हे सत्तासुंदरीचं सर्वात भयानक रूप, जे आपल्याला गिळून टाकणार आहे, हे सत्तेची झोप उघडल्यावरच कळतं.
कुंभकर्णासारखं सत्तेची झोप घेऊन झोपलेल्यांची, शेवटी जनता दरबारी गेल्यावर झोप उडते आणि कळतं की ही सत्तासुंदरी आता विषकन्या झालीय आणि विष आता एवढं चढलंय की आपण रस्त्यावर आलोय, आणि रस्त्यावरचा कोणताही `सर्व सामान्य`, `कॉमन मॅन`, `आम आदमी` आपल्याकडे पाहत नाहीय, तो एवढ्या लवकर आपली ओळख विसरलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.