मिस युनिव्हर्स : ‘बेस्ट ऑफ लक’ मानसी!

By Shubhangi Palve | Last Updated: Saturday, November 9, 2013 - 18:22

www.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूर
कोळशांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूरला सध्या सौंदर्याची `खाण` सापडलीय. मानसी मोघे ही चंद्रपूरची कन्या थेट मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करतेय. २१ वर्षांची मानसी सध्या मॉस्कोमध्ये होत असलेल्या स्पर्धेसाठी रशियात पोहोचलीय. आज होणाऱ्या मिस युनिवर्सच्या अंतिम फेरीत तिनं सौंदर्यसम्राज्ञीचा मुकूट जिंकावा, अशी प्रार्थना तमाम चंद्रपूरकर करतायत.
जगातल्या सौंदर्यवती महिलांचा मेळा सध्या मॉस्कोत भरलाय. निमित्त आहे ते ‘मिस युनिव्हर्स २०१३’ स्पर्धेचं. मॉस्कोत सुरु असलेल्या या स्पर्धेकडं महाराष्ट्राचं विशेषत: चंद्रपूरकरांचं विशेष लक्ष लागलंय. त्याचं कारणही तिसचं खास आहे. मानसी मिलींद मोघे ही २१ वर्षांची चंद्रपूर कन्या सध्या या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करतेय. मानसीचे आई-वडील दोघेही ‘वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड’ या सरकारी खाण कंपनीत वैद्यकीय अधिकारी रुपात कार्यरत आहेत. गेले काही वर्षे चंद्रपूर ‘डब्ल्यूसीएल’ क्षेत्रीय रुग्णालयात दोघेही वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत आहेत. सौंदर्यवती मानसी या दाम्पत्याची ज्येष्ठ कन्या. आपली कनिष्ठ कन्या जागृतीसह हा परिवार मानसीच्या मिस युनिवर्स स्पर्धेतील यशाकडे डोळे लावून बसलाय.
आपल्या सोबात खेळणारी, मस्ती करणारी आपली बहिण आता जागतिक स्पर्धेत यशाच्या उंबरठ्यावर असल्याने तिच्या लहान बहिणीचा आनंद गगनात मावेनासा झालाय. या स्पर्धेतील काही टिप्स आपण तिला दिल्याचे ती लाजून सांगते. या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी तिने मानसीला शुभेच्छा दिल्यात.

९ नोव्हेंबरपासून ‘मिस युनीव्हर्स स्पर्धे’ची अंतिम फेरी सुरु होतीय. त्यासाठी आता मानसीला शुभेच्छांची गरज आहे. मानसीच्या निमित्ताने एका मराठी कन्येने सौंदर्यवतीचा किताब सर करावा अशीच प्रार्थना सारे चंद्रपूरकर करत आहेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, November 9, 2013 - 10:14
comments powered by Disqus