नेस वाडियाच्या वडिलांना आला इराणमधून फोन

प्रिती झिंटा आणि नेस वाडिया प्रकरण आता वेगळ्याच वळणावर पोहोचलंय. नेस वाडीयांचे वडील नस्ली वाडिया यांना आलेला धमकीचा फोन हा इराणमधून आल्याचे सांगण्यात येत आहे. फोन नंबर इराणचा असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगितले जात आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 19, 2014, 12:03 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
प्रिती झिंटा आणि नेस वाडिया प्रकरण आता वेगळ्याच वळणावर पोहोचलंय. नेस वाडीयांचे वडील नस्ली वाडिया यांना आलेला धमकीचा फोन हा इराणमधून आल्याचे सांगण्यात येत आहे. फोन नंबर इराणचा असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगितले जात आहे.
प्रिती झिंटा आणि नेस वाडिया प्रकरणात अंडरवर्ल्डनं देखील उड़ी घेतल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. नेस वाडीयांचे वडील नस्ली वाडिया यांना कुख्यात गुंड रवी पुजारीनं धमक्या दिल्याची तक्रार त्यांनी एन एम जोशी पोलीस ठाण्यात केलीय. याप्रकरणी मुंबई क्राइम ब्रँचचं खंडणी विरोधी पथक चौकशी करत असल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिलीय.
बॉलिवूड, अंडरवर्ल्ड आणि उद्योगपतींमधलं कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलंय. प्रिती झिंटानं नेस वाडियाविरोधात केलेल्या तक्रारीच्या प्रकरणामध्ये ट्विस्ट आलाय. अंडरवर्ल्ड रवी पुजारीनं धमकी दिल्याची तक्रार नेस वाडिया यांचे वडील नस्ली वाडिया यांनी केलीय. प्रिती झिंटाला त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे, अशा स्वरुपाची धमकी रवी पुजारीकडून आल्याचं वाडियांनी तक्रारीत म्हटलंय.
१६ तारखेला दिवसभरात एकूण पाच धमकीचे फ़ोन आले. संध्याकाळी चारच्या सुमाराला नुसली वाडीया यांच्या एका सेक्रेटरीच्या मोबाईलवर फोन आला. यावेळी समोरच्या व्यक्तीनं समोरुन शिव्या दिल्या. अगर प्रिती के मामले में कुछ किया तो, उसके परिणाम भुगतने पडेंगे, प्रिती से दूर रहो. नहीं तो बिझनस में बड़ा नुक़सान झेलना पड़ेगा आणि पुन्हा शिव्या. हा फ़ोन आल्यानंतर बॉम्बे डाईंगच्या ऑफिसमध्ये एकच खळबळ उडाली, नस्ली वाडिया यांच्या सेक्रेटरीनं लगेच नस्ली वाडियांना झाल्या प्रकाराची कल्पना दिली.
पुन्हा रात्री आठच्या सुमाराला नसली वाडीया यांच्या सेक्रेटरीच्या फोनवर एक एसएमएस अाला..- " DONT MISCHIEF WITH PRITI OR ELSE U WILL FACE MAJOR LOSS IN BUSINESS " हा एसएमएस वाचून पुन्हा बाॅम्बे डाईंग कंपनीत खळबळ उडाली.
नेस वाडियानं आयपीएल मॅचच्या दरम्यान छेडछाड केल्याची तक्रार प्रितीनं मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये केलीय. याबाबत पुरावे तपासून कारवाई करणार असल्याचं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही स्पष्ट केलंय. यासंदर्भात किंग्ज इलेव्हन पंजाबचे सीओओ, तसंच मॅचदरम्यान उपस्थितांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. सध्या प्रीती आणि नेस दोघेही भारताबाहेर असल्यानं त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय. प्रितीच्या तक्रारीचा तपास सुरू असतानाच आता रवी पुजारीकडून नस्ली वाडियांना धमकी आल्याची तक्रार आलीय.

कोण आहे रवी पुजारी
सुरुवातीला खंडणी मागणारं अंडरवर्ल्ड नंतर सिनेमांमध्ये पैसे गुंतवू लागलं. एवढंच नाही तर एखाद्याचा सिनेमा चालावा म्हणून अंडरवर्ल्डनं अनेकांवर थेट ट्रिगरही चालवलं. अंधेरीत गुन्हेगारी जगाची सुरुवात करणा-या रवी पुजारीनं आणि अबू सालेमनं बॉलिवूडकरांना खूप त्रास दिलाय.
मुंबईतल्या अंधेरीमधल्या चाळीमधून रवी पुजारीच्या गुन्हेगारी कारवायांना सुरुवात झाली. बिल्डर्सकडून खंडणी मागण्याचं काम रवी पुजारी टोळी करते. मुंबई आणि कर्नाटकमध्ये ही गँग सक्रिय आहे. देशभरात रवी पुजारी गँगचे जवळपास २०० गुंड आहेत.
१९९० मध्ये चेंबूरमधल्या कुकरेजा बिल्डर हत्या प्रकरणात रवी पुजारीचा हात आहे. ९० च्या दशकात रवी पुजारी गँग छोटा राजन गँगमध्ये विलीन झाली. बँकॉकमध्ये छोटा राजनवर हल्ला झाल्यानंतर पुजारी गँग दाऊदची शत्रू झाली.

आतापर्यंत सलमान खान, फरहान अख़्तर, अक्षय कुमार, विवेक ओबेराय, बोनी कपूर, सोहेल खान, आणि करण जोहर या सारख्या दिग्गजांना रवी पुजारीनं धमक्या दिल्या आहेत. आता प्रिती झिंटा आणि नेस वाडिया प्रकरणात ही नवी धमकी आलीय. आता या ट्विस्टसह पोलीस मूळ प्रकरणाचा तपास कसा करतायत, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.