पाकचे अक्षयच्या ‘खिलाडी ७८६’ला रेड कार्पेट!

खिलाडी म्हटले म्हणजे सर्वात प्रथम डोळ्यासमोर नाव येतं ते अक्षय कुमारचे. आता खिलाडी या नावाशी पुन्हा एकदा अक्कीचा संबंध येणार आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 8, 2012, 06:17 PM IST

www.24taas.com, इस्लामाबाद
खिलाडी म्हटले म्हणजे सर्वात प्रथम डोळ्यासमोर नाव येतं ते अक्षय कुमारचे. आता खिलाडी या नावाशी पुन्हा एकदा अक्कीचा संबंध येणार आहे. तो त्याच्या आगामी ‘खिलाडी ७८६’ या चित्रपटाच्या निमित्ताने. खिलाडीशी ७८६ हा अंक जोडला गेल्याने पाकिस्तानचे पंतप्रधानही आता अक्षय कुमारच्या प्रेमात पडले असून त्यांनी या चित्रपटाच्या प्रिमिअरसाठी चक्क अक्कीला आमंत्रण दिले आहे.
या चित्रपटात अक्षयकुमार एका मुस्लिम नायकाच्या भूमिकेत दिसत आहे. त्यामुळेच की काय पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेज अरशफ यांनी अक्षयला पाकिस्तान येण्याचे आमंत्रण पाठवले आहे. यासंदर्भात एक पत्र पाकच्या पंतप्रधान कार्यालयाने अक्षयला पाठवले आहे. यात अक्षयच्या आगामी खिलाडी ७८६चा प्रिमियर पाकिस्तानात करण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली. प्रिमियर सोहळ्यादरम्यान ‘खिलाडी ७८६’च्या संपूर्ण टीमला पाकिस्तानात कडक सुरक्षा व्यवस्था देण्यात येईल, अशी हमी देण्यात आली आहे.
अद्याप तरी अक्षयने या बाबतचा निर्णय कळवलेला नाहीये. पण अक्षय पाकिस्तानात जाणार का? याकडे बॉलिवूडसह भारताचे लक्ष लागून राहिले आहे.
सैफचा एजंट विनोद आणि सलमानचा एक था टायगर या खान बंधूचा चित्रपटांना पाकिस्तानात याच वर्षी बंदी घातली होती. मात्र अक्षयकुमारला रेड कार्पेट घातल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.