बीसीसीआयची चौकशी समितीच बोगस - हायकोर्ट

मुंबई हायकोर्टानं स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयनं दिलेल्या अहवालाला कचऱ्याची टोपली दाखवलीय. एव्हढंच नाही तर बीसीसीआयनं नेमलेली चौकशी समितीच नियमबाह्य असल्याचं मुंबई हायकोर्टानं म्हटलंय

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 30, 2013, 01:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई हायकोर्टानं स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयनं दिलेल्या अहवालाला कचऱ्याची टोपली दाखवलीय. एव्हढंच नाही तर बीसीसीआयनं नेमलेली चौकशी समितीच नियमबाह्य असल्याचं मुंबई हायकोर्टानं म्हटलंय. त्यामुळे गुरुनाथ मय्यपन आणि राज कुंद्रा यांना स्पॉट फिक्सिंग प्रकरणात क्लीन चिट देणारी बीसीसीआय तोंडावर पडलीय.
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी नेमण्यात आलेली दोन सदस्यीय चौकशी समिती नियमबाह्य असल्याचा निकाल मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिलाय. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जचे मालक श्रीनिवासन यांना चांगलाच दणका बसला आहे. नवीन चौकशी समिती नेमण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बीसीसीआयला दिले आहेत. माजी निवृत्तन्यायमूर्ती टी.जयराम चौटा आणि आर. बालसुब्रह्मण्यम यांच्या चौकशी समितीने स्पॉट फिक्सिंग प्रकरणी तयार केलेल्या अहवालात श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मय्यपन, राजस्थान रॉयल्सचा मालक राज कुंद्रा यांना क्लीन चीट दिली होती. बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीपुढे हा चौकशी अहवाल रविवारी सादर करण्यात आला.
मात्र, ही समिती नियमबाह्य ठरवल्यामुळे श्रीनिवासन यांच्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर पुन्हा विराजमान होण्याची आशा धूसर झाली आहे. दरम्यान, बोर्डाच्या नियमाप्रमाणे हा अहवाल आयपीएल गव्हर्निग कौन्सिलकडे सुपूर्द केला जाईल. त्यावर दोन ऑगस्टला कौन्सिलच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल’, असे बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी सांगितले.

राज कुंद्रा आणि गुरुनाथ मयप्पन यांना क्लीन चिट देण्याविषयी क्रीडा मंत्रालयानं बीसीसीआयला पोलीस चौकशी पूर्ण होण्याची वाट पाहण्याचा सल्ला दिलाय. दरम्यान, कोर्टात विचाराधीन असलेल्या एखाद्या खटल्यासंदर्भात बीसीसीआय कसा निर्णय देऊ शकते, असा सवाल मुंबई पोलिसांनीही उपस्थित केलाय
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.