... आणि सिद्धूनं दिली चुकीची कबूली

बीग बॉस सीझन ६ मध्ये एका खेळादरम्यान सिद्धूला आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत तुम्ही कधी गद्दारी केली आहे का? असा प्रश्न विचारला गेला. या प्रश्नाचं उत्तर सिद्धूनं ‘होय’ असं दिलं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 8, 2012, 10:06 AM IST

www.24taas.com, मुंबई
‘बीग बॉस’ आणि चर्चेला उधाण ही काही आता तुमच्या आमच्यासाठी नवी गोष्ट राहिलेली नाही. यंदाच्या बीग बॉस सीझनमध्ये माजी कसोटीपटू नवज्योत सिंग सिद्धूनं आपल्या शांत आणि मिस्किल स्वभावानं अनेकांना आपल्याकडे आकर्षित केलंय. पण याच सिद्धूच्या एका वक्तव्यानं पुन्हा एकदा एका नव्या चर्चेला प्रारंभ झालाय.
बीग बॉस सीझन ६ मध्ये एका खेळादरम्यान सिद्धूला आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत तुम्ही कधी गद्दारी केली आहे का? असा प्रश्न विचारला गेला. या प्रश्नाचं उत्तर सिद्धूनं ‘होय’ असं दिलं. ‘शारजात झालेल्या एका खेळादरम्यान कर्टनी वॉल्शची कॅच मी बॉर्डरवर पकडली होती आणि तो सामना भारतानं जिंकला होता. तेव्हा मी चिटींग केली होती आणि त्याचा पश्चाताप मला आजही होतो. एकांतात बसल्यानंतर त्या घटनेचा विचार जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा मनाला रुखरुख लागून राहते’ असं नवज्योत सिंग सिद्धू यानं म्हटलंय.
नवज्योत सिंग सिद्धूनं चिटींगची कबूली दिल्यानंतर क्रिडाक्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुरू झाल्यात. ‘सिद्धूकडून हे अजाणतेपणी झालं असेल तर ते क्षमायोग्य आहे पण त्यानं हे जाणीवपूर्वक केलं असेल तर मात्र ती गंभीर गोष्ट आहे’ अशी प्रतिक्रिया माजी कसोटीपटून किर्ती आझाद यांनी दिलीय. तर बिशन सिंग बेदी यांनी मात्र प्रतिक्रिया देणं टाळलंय.