साहेबांवर पाडला पैशांचा पाऊस, उडवल्या नोटा

अजित पवारांच्या असभ्य वक्तव्यावरुन सुरु असलेल्या वादाचा धुराळा खाली बसत असतानाच, राजकीय नेत्यांच्या निर्ढावलेल्या पणाचा आणखी एक धक्कादायक प्रकार बुलढाण्यात उघडकीस आलाय.

Updated: Apr 9, 2013, 04:01 PM IST

www.24taas.com, बुलडाणा
अजित पवारांच्या असभ्य वक्तव्यावरुन सुरु असलेल्या वादाचा धुराळा खाली बसत असतानाच, राजकीय नेत्यांच्या निर्ढावलेल्या पणाचा आणखी एक धक्कादायक प्रकार बुलढाण्यात उघडकीस आलाय. काँग्रेस आमदारांच्या उपस्थितीत नोटांचा पाऊस पाडण्यात आलाय. माजी नगरसेवकाच्या वाढदिवसी या नोटा उधळण्यात आल्या आहेत.
काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांच्या उपस्थितीत हा सगळा प्रकार घडत होता. आणि फक्त घडतच नव्हता तर खुद्द आमदार साहेबांच्यावर ही नोटांची उधळण केली जात होती. माजी नगरसेवकांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांनी आपली उपस्थिती लावली.

याचवेळेस आमदारासाहेबांवर पैशांची अशी काय उधळण केली. की त्याने साऱ्यांचेच डोळे दीपून गेले... एखाद्या नृत्यांगनावर ज्या प्रकारे पैसे उडविले जातात त्याच प्रकारे आमदारांवर पैसे उडविले गेले. राज्यात दुष्काळाची स्थिती असताना, राजकीय नेते इतके निर्ढावले आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुष्काळग्रस्त राज्यात चाललंय तरी काय, असा सवाल यानिमित्तानं उपस्थित झाला आहे.