तुमच्यासाठी कोण महत्त्वाचं... मुलं की मोबाईल?

सगळ्या आई-वडिलांसाठी ही एक महत्त्वाची बातमी... तुम्ही तुमचा सगळ्यात जास्त वेळ कशासाठी देता? याचं उत्तर एका स्वयंसेवी संस्थेनं सर्वेक्षणाच्या माध्यमातून शोधायचा प्रयत्न केला.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 26, 2013, 04:05 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सगळ्या आई-वडिलांसाठी ही एक महत्त्वाची बातमी... तुम्ही तुमचा सगळ्यात जास्त वेळ कशासाठी देता? याचं उत्तर एका स्वयंसेवी संस्थेनं सर्वेक्षणाच्या माध्यमातून शोधायचा प्रयत्न केला. खरं तर मुलांसाठी सगळ्यात जास्त वेळ देतो… असं उत्तर मिळणं अपेक्षित होतं. मात्र, जो निष्कर्ष समोर आलाय, तो चक्रावून टाकणारा आहे.
मुंबईच्या एका ‘एनजीओ’नं केलेल्या सर्वेक्षणात काही धक्कादायक गोष्टी समोर आल्यात. मुंबईमध्ये जवळपास ५,६०० पालक आणि १,९०० विद्यार्थ्यांमध्ये सर्वेक्षण केलं. त्यानुसार ७८ टक्के वडील आठवडाभरात फक्त २२ ते २५ तासच मुलांसाठी देतात. तर नोकरी करणाऱ्या ८० टक्के महिला त्यांच्या मुलांसाठी आठवडाभरात फक्त ३० से ४० तासच देऊ शकतात. दुर्दैवानं मुलांपेक्षा मोबाईललाच जास्त वेळ दिला जातो. ८९ टक्के पुरुष आठवडाभरात तब्बल ७५ तास फोनवर असता तर नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या ७९ टक्के महिला आठवडाभरात ८० पेक्षा जास्त तास मोबाईलवर बोलतात. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये गृहिणीही मागे नाहीत. ७६ टक्के गृहिणी आठवडाभरात ६८ तास फोनवर असतात. या धक्कादायक निष्कर्षानंतर मुंबईच्या काही शाळांनी पालकांना यासंदर्भात काही सूचना केल्यात.
आई-बाबा जास्त वेळ मोबाईलवर बोलतात, याचा अर्थ त्यांच्याकडे आपल्यासाठी वेळ नाही, असा मुलांचा समज होतो. याचा परिणाम मुलांच्या विकासावर होत असल्याचं मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नज्नीम लदाख यांनी म्हटलंय.

पैसा कमावण्याची धावपळ, समाजातलं स्टेटस मिळवण्याची धडपड या रॅट रेसमध्ये जो तो आपापल्या परीनं धावतोय... पण त्यामध्ये तुमच्या मुलांना वेळच दिला जात नाहीय. याच्याकडे गंभीरपणे लक्ष द्या... भविष्यकाळात जेव्हा तुम्हाला मुलांची गरज असेल तेव्हा तुमची मुलं इतरांशी मोबाईलवर बोलत बसली, तर दोष कुणाचा, याचा विचार आजच करा.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.