बीडचं मुंडे हॉस्पिटल सील

परळीतल्या डॉ. सुदाम मुंडेचं हॉस्पिटल सील करण्यात आलंय. उपजिल्हाधिकारी, महसूल प्रशासनाचे अधिकारी यांनी ही कारवाई केली.

Updated: May 24, 2012, 05:15 PM IST

www.24taas.com, बीड

 

परळीतल्या डॉ. सुदाम मुंडेचं हॉस्पिटल सील करण्यात आलंय. उपजिल्हाधिकारी, महसूल प्रशासनाचे अधिकारी यांनी ही कारवाई केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या हॉस्पिटलला सील ठोकल्यानंतर तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. गर्भपात करण्यात आलेल्या मृत महिलेचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी मुंडे दांम्पत्यावर गुन्हा दाखल करून त्यांना फरार घोषित केलंय. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून मयत महिलेच्या पतीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

 

राजकीय वरदहस्त असलेल्या सुदाम मुंडेच्या हॉस्पिटलमधील दुष्कृत्यांचा पर्दाफाश 'झी 24 तास'नं केल्यानंतर, तो आता पुरता अडचणीत सापडला आहे. सुदाम मुंडे याच्या आत्तापर्यंतच्या दुष्कृत्यांवर एक नजर टाकूयात...

 

पाढा डॉ. मुंडेच्या दुष्कृत्याचा

 

-    स्त्री भ्रूण हत्यांसाठी गेल्या 10-12 वर्षांपासून परळीतल्या डॉ. सुदाम मुंडेचं हॉस्पिटल सतत चर्चेत  आहे.

-    2010 साली हॉस्पिटलमध्ये स्टिंग ऑपरेशननंतर सोनोग्राफी मशिन सील झाले.

-    ४ जून २०११ काही मृत भ्रूण मुंडेंच्या शेतात आणि विहिरीत सापडले.

-    सुदाम मुंडेवर गुन्हा दाखल आणि सहा दिवसांची पोलीस कोठडी

-    अटकेनंतरही सुदाम मुंडेत सुधारणा नाही, भोपा येथील गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर पुन्हा वादात.

-    2 वर्ष सोनोग्राफी मशीन सील, तरी गर्भ लिंग निदान आणि गर्भपातही चोरीछुप्या पद्धतीने सुरुच होते.

-    डॉ. सुदाम मंडेवर राजकीय वरदहस्त असल्याचीही चर्चा

 

कोण आहे हा डॉ. सुदाम मुंडे... काय आहे त्याची पार्श्वभूमी...

 

-    सुदाम मुंडे परळी तालुक्यातील सारडगावचा रहिवासी आहे.

-    गरिबीच्या परिस्थितीतही औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस, एम.एस.ची पदवी त्यानं मिळवली.

-    1980 मध्ये डॉ. सरस्वती केंद्रे यांच्याशी विवाहबद्ध.

-    मुंडेची पत्नी सरस्वती केंद्रे एम.बी.बी. एस आणि स्त्री रोग तज्ज्ञ आहेत.

-    1984 साली परळीत स्वत:चे हॉस्पिटल सुरु केले.

-    डॉ. मुंडे गेल्या 27 वर्षांपासून परळीत वैद्यकीय व्यवसाय करत आहे.

-    दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्टिंग ऑपरेशननंतर मुंडे दांपत्य चर्चेत आलं.