`आप`चा सुपडा, `झाडू`नेच केले साफ

भ्रष्टाचारावर बेंबीच्या देटापासून ओरडणाऱ्या आणि हातात झाडू घेऊन आम्ही राजकारणातील घाण साफ करणार अशी आरोळी ठोकणाऱ्या आम आदमी पार्टीला उभी राहण्याआधीच जनतेने नाकारले. झाडू घेऊन मैदानात उतरलेल्या आम आदमी पार्टीला दिल्लीनंतर मुंबईत जनाधार लाभेल हा आशावाद लोकसभा निकालाने फोल ठरला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 17, 2014, 02:41 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भ्रष्टाचारावर बेंबीच्या देटापासून ओरडणाऱ्या आणि हातात झाडू घेऊन आम्ही राजकारणातील घाण साफ करणार अशी आरोळी ठोकणाऱ्या आम आदमी पार्टीला उभी राहण्याआधीच जनतेने नाकारले. झाडू घेऊन मैदानात उतरलेल्या आम आदमी पार्टीला दिल्लीनंतर मुंबईत जनाधार लाभेल हा आशावाद लोकसभा निकालाने फोल ठरला.
`आप`चा हमखास विजय असा बोलबाला असलेली चंद्रपूरची जागाही हातची गेली. वामनराव चटप यांनी जागा दोन लाखांहून अधिक मते मिळवूनही त्यांना ही जागा जिंकता आली नाही. तर अनेक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. मुंबईत मेधा पाटकर, मयंक गांधी यांना कसेबसे आपले डिपॉझिट वाचवण्यात यश आले.
दिल्लीतील भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला समाजसेवक अण्णा हजारे यांनी बळ दिले. सत्तेच्या चाव्या हाती आल्या परंतु त्यांना आपला त्याचा लाभ उठवता आला नाही. सत्तेची नशा आणि आम्हीच निवडून येणार असा अती आत्मविश्वास आपला नडलाय.
अरविंद केजरीवाल आणि अण्णा हजारे यांच्यात वितुष्ट आले. महाराष्ट्रात `आप`ने बाळसे धरण्यास हा पहिला अपशकून घडला. त्यानंतर मेधा पाटकर यांच्यासारखी अगदी मोजकीच नामांकित मंडळी `आप`शी जोडली गेली. मात्र अनेकांनी आपपासून चार हात दूर राहणे पसंत केले. `आप`च्या मुंबईतील सहा उमेदवारांना एकूण २ लाख ५२ हजार २४९ मते पडली. ईशान्य मुंबईतील उमेदवार सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना ७६ हजार ४५१ तर उत्तर पश्चिम मुंबईतील मयंक गांधी यांना ५१ हजार ८३५ मते मिळाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले.
या निवडणुकीत आम आदमी पार्टीचे उमेदवार म्हणून चंद्रपूरचे उमेदवार माजी आमदार वामनराव चटप यांना त्यांच्या पक्षातील उमेदवारांमध्ये सर्वाधिक म्हणजे २ लाख ४ हजार ४०५ मते मिळाली. त्यानंतर मेधा पाटकर आणि नागपूरच्या उमेदवार अंजली दमानिया यांना ६९ हजार ०८१ मते आहेत. अंजली दमानिया यांच्या आत्मविश्वासाची हवाच निघाली आहे. त्यांना साधे डिपॉझिटही वाचवता आले नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.