दिल्लीत भाजप खासदाराला फोनवर धमकी, 25 लाखांची मागणी

दिल्लीतल्या त्रिनगर विधानसभा क्षेत्रातले भाजपचे खासदार डॉ. नंदकिशोर गर्ग यांना फोनवरून खंडणी वसुलीसाठी धमकी मिळाल्याचं पुढं आलंय. डॉक्टर नंदकिशोर आणि त्यांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची मागणी आणि पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी मिळालीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 1, 2014, 08:44 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीतल्या त्रिनगर विधानसभा क्षेत्रातले भाजपचे खासदार डॉ. नंदकिशोर गर्ग यांना फोनवरून खंडणी वसुलीसाठी धमकी मिळाल्याचं पुढं आलंय. डॉक्टर नंदकिशोर आणि त्यांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची मागणी आणि पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी मिळालीय. याप्रकरणी पंजाबी बाग पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
देशाची राजधानी किती असुरक्षित आहे हे पुन्हा एकदा पुढं आलंय. जिथं खासदारालाच खंडणीसाठी धमकी मिळते तिथं सामान्यांचं काय? मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा 26 मेला देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेत होते. तेव्हा डॉ. गर्ग यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकी मिळत होती.
डॉ. गर्ग शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनात होते. तिथंच हा पहिला फोन आला. फोन खासदारांच्या पीएनं उचलला. कार्यक्रम संपल्यानंतर त्यानं डॉ. गर्गना माहिती दिली आणि सर्व घटना सांगितली. मात्र डॉ. नंदकिशोर गर्ग यांनी हा फोन गंभीरपणे घेतला नाही, कोणी तरी गंमत केली असेल, असं त्यांना वाटलंय पण जेव्हा त्यांच्या कुटुंबियांनाही असेच धमकीचे फोन येवू लागले तेव्हा त्यांनी पोलिसांत तक्रार केली.
फोनवरून धमकी देणाऱ्यानं आपलं नाव नीरज असं सांगितलंय. पोलिसांनी फोन ट्रेस केला असता, नंबर कोणत्या तरी पांडेच्या नावावर असल्याचं कळलं. पण तो फोन अनेक दिवसांपूर्वीच चोरी गेल्याचं कळलं. खासदार गर्ग यांच्या मते त्यांना ज्या नंबरवरून धमकीचा फोन आला त्याच नंबरवरून त्यांच्या कुटुंबियांनाही फोन आला.
‘आता तुमचे अच्छे दिन आले आहेत 25 लाख द्या’, असा हा धमकीचा फोन होता. डॉ. गर्ग यांचा फोन नंबर तर सार्वजनिक आहे मात्र त्यांच्या कुटुंबियांच्या फोनवर धमकी मिळणं गंभीर आहे. आता खासदारांकडीलच केस असल्यानं पोलीसही कामाला लागले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.