वस्त्रहरणापूर्वी राणेंना दणका, कांबळींचे NCPकडून ‘हरण’

कोकणात नारायण राणे विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष शिगेला पोहचला आहे. राणेंनी उद्या कुडाळमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचं वस्त्रहरण करण्याचं जाहीर केलं असताना त्याआधीच त्यांचे कट्टर समर्थक माजी आमदार शंकर कांबळी यांना फोडून राष्ट्रवादीनं राणेंना आणखी एक दणका दिला आहे.

Updated: Jan 30, 2012, 11:12 PM IST

www.24taas.com, सिंधुदुर्ग

 

कोकणात नारायण राणे विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष शिगेला पोहचला आहे. राणेंनी उद्या कुडाळमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचं वस्त्रहरण करण्याचं जाहीर केलं असताना त्याआधीच त्यांचे कट्टर समर्थक माजी आमदार शंकर कांबळी यांना फोडून राष्ट्रवादीनं राणेंना आणखी एक दणका दिला आहे.

 

कांबळी यांची मोठी ताकद नसली तरी माजी आमदार असलेले कांबळी राणेंचे कट्टर समर्थक मानले जात होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं वातावरण असताना त्यांना पक्षात आणून राणेंविरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीनं केला आहे.

 

आमदार दीपक केसरकर यांनी कांबळींना राष्ट्रवादीच्या गळाला लावलं. केसरकर आणि राणे यांच्यातला संघर्ष नगरपरिषद निवडणुकीत शिगेला पोचला होता. भाजप, शिवसेना या पक्षांनाही बरोबर घेऊन केसरकर यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी राणेंविरोधात आघाडी केली.

 

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार पुष्पसेन सावंत यांना फोडून त्यांचा अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी प्रवेश घडवून आणला होता. राणेंविरोधात आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीला जशास तसे उत्तर देण्यासाठी राणेंनी उद्या वस्त्रहरण मेळाव्याचं आयोजन केलं असताना त्याआधीच कांबळींना गळाला लावून राष्ट्रवादीनं राणेंना आणखी डिवचलं आहे.

 

आता राष्ट्रवादीनं राणेंना डिवचल्यानं मालवणी मुलखात उद्या होणा-या राजकीय वस्त्रहरण नाट्याचा अंक आणखी रंगतदार होण्याची चिन्हं आहेत..... सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यात पुन्हा धुमशान होणार आहे. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी थेट राष्ट्रवादीच्या नेत्यांचं वस्त्रहरण करण्याचा इशारा दिलाय.

 

तशी जाहिरातच वृत्तपत्रात दिलीय. त्यामुळं या दोन पक्षातला संघर्ष पुन्हा झडणार आहे. नगरपालिका निवडणुकीत सिंधुदूर्गवासियांना याची झलक पहायला मिळाली होती. तर आता जिल्हा परिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुडाळ इथं मागच्या आठवड्यात या धुमशानला सुरुवात केली.

 

राणेंच्या बालेकिल्ल्यात थेट आव्हान दिलं होतं. पुष्पसेन सावंत यांच्यापाठोपाठ आता नारायण राणेंचे समर्थक असलेले शंकर कांबळीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डेरेदाखल झालेत. त्यामुळे नारायण राणे कुडाळमध्ये त्यांच्या खास स्टाईलमध्ये राष्ट्रवादीचं वस्त्रहरण करणार असल्याची चर्चा जोरात सुरू झालीय. काँग्रेसच्या नेत्यांसह आणि नारायण राणेंच्या समर्थकांनाही राष्ट्रवादीमध्ये घेऊन अजितदादा राणेंना त्यांच्या बालेकिल्ल्यात डिवचत आहेत. नारायण राणे याची कशी परतफेड करतात ? हे आता उद्या कुडाळमधल्या राजकीय मंचावरील पडदा हटल्यानंतरच कळेल.