नोटाबंदीनंतर ५००, १०००च्या ९७ टक्के जुन्या नोटा बँकेत जमा

काळ्या पैशावरील सर्जिकल स्ट्राईकनंतर रिझर्व्ह बँकेकडे ३० डिसेंबरपर्यंत ५०० आणि हजाराच्या नोटांच्या स्वरुपात तब्बल १४.९७ लाख कोटी रुपये जमा झालेत. 

Updated: Jan 5, 2017, 03:38 PM IST
नोटाबंदीनंतर ५००, १०००च्या ९७ टक्के जुन्या नोटा बँकेत जमा title=

नवी दिल्ली : काळ्या पैशावरील सर्जिकल स्ट्राईकनंतर रिझर्व्ह बँकेकडे ३० डिसेंबरपर्यंत ५०० आणि हजाराच्या नोटांच्या स्वरुपात तब्बल १४.९७ लाख कोटी रुपये जमा झालेत. 

एकूण १५.४४ लाख कोटी रुपयांपैकी ९७ टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा झाल्याचे बिझनेस स्टँडर्ड या इंग्रजी दैनिकानं म्हटलंय. काळा पैसा हद्दपार करण्यासाठी ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी निर्णयाची घोषणा केली. त्यावेळी १५.४४ लाख कोटी रुपये किंमतीच्या जुन्या नोटा चलनात होत्या. 

नोटाबंदी निर्णयानंतर रद्द केलेल्या नोटा बँकांमध्ये ३० डिसेंबरपर्यंत जमा करण्याची मुदत देण्यात आली होती. बाजारात एकूण १५.४ लाख कोटी रुपयांच्या जुन्या बाजारात चलनात असल्याचा अंदाज केंद्र सरकारकडून व्यक्त करण्यात आला होता. 

यातील ५ लाख कोटी रुपयांच्या नोटा या काळा पैशांच्या स्वरुपातील असून नोटाबंदी निर्णयानंतर या नोटांचा काही उपयोग होणार नसून त्या पुन्हा चलनात येऊ शकणार नाहीत, असेही केंद्र सरकारकडून सांगण्यात आले होते. 

रिझर्व्ह बँकेकडे आतापर्यंत किती जुन्या नोटा जमा झाल्या याची पुन्हा एकदा मोजणी करुन अंतिम आकडा लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.