अण्णा आणि राहुल गांधी... पत्रांचा सिलसिला!

लोकपाल बिल राज्यसभेत पास करण्याच्या आपल्या कटिबद्धतेसाठी अण्णा हजारेंनी राहुल गांधींना पत्र पाठवून त्यांचं कौतुक केल्याचं काँग्रेस नेते अजय माकण यांनी म्हटलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 17, 2013, 03:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली / राळेगणसिद्धी
लोकपाल विधेयक आजच संमत व्हावं यासाठी राहुल गांधींच्या आदेशानंतर केंद्र सरकारनं जोरदार कंबर कसलीय. लोकपाल बिल राज्यसभेत पास करण्याच्या आपल्या कटिबद्धतेसाठी अण्णा हजारेंनी राहुल गांधींना पत्र पाठवून त्यांचं कौतुक केल्याचं काँग्रेस नेते अजय माकण यांनी म्हटलंय. त्यानंतर अण्णांनी पत्र पाठवल्याबाबत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी त्यांचे आभार मानलेत...सरकार मजबूत आणि सक्षम लोकपालासाठी कटीबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलंय..
दरम्यान, लोकपालचे अधिकार राष्ट्रपतींना द्या, असं सांगत शिवसेनेनं लोकपाल विधेयकास विरोध केलाय. अण्णांनी राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात ‘जनलोकपाल बिल पास करण्यबाबत जी प्रतिबद्धता दाखवली त्याचे स्वागत केले. या विधेयकात आणखी काही गोष्टींचा सामवेश करून त्यातील त्रुटी दूर कराव्यात आणि हा कायदा अधिक सक्षम करण्याचा सरकारने प्रयत्न करावा’ असं आवाहनही केलंय.
तर, राहुल गांधींनी अण्णांच्या या पत्राला दिलेल्या उत्तरात अण्णा हजारेंना, आपण देशाला मजबूत लोकपाल देण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचं म्हटलंय. त्यांचं हे पत्र मंगळवारी मीडियासमोर सादर केलं गेलं. ‘आम्ही तुमच्या भूमिकेचं स्वागत करतो आणि तुमच्या सहयोगासाठी आभार व्यक्त करतो’.
दरम्यान, लोकपाल विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यासाठी काँग्रेसनं हालचाली सुरु केल्यात. त्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी एक बैठक बोलावली होती. या बैठकीत संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ आणि पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायण सामी सामील झाले होते. या बैठकीत, राज्यसभेत कुठल्याही परिस्थितीत लोकपाल बिल पास झालंच पाहिजे, असं राहुल गांधींनी म्हटल्याचं कमलनाथ यांनी म्हटलंय. काँग्रेस आणि भाजपनं या विधेयकाला पाठिंबा दर्शवलाय. लोकपालवरील राज्यसभेतल्या चर्चेत शिवसेना सहभागी होणार असली तरी मतदान करणार नाही. दुसरीकडे सपा आणि बसपानं या विधेयकाला विरोध केलाय. सपाचा मन वळवण्याचा प्रयत्न काँग्रेसनं सुरु केलाय. मात्र काँग्रेस आणि अण्णांचं डील झाल्याचा आरोप सपाने केलाय.

व्हिडिओ पाहा -

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.