आंदोलनाचा हेतू साध्य – केजरीवाल

संसद, पंतप्रधान कार्यालय, सोनिया गांधींचे निवासस्थान, भाजप कार्यालय या सर्वच ठिकाणी केजरीवाल समर्थकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी बॅरिकेट्स तोडण्यात आले, तसच सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 26, 2012, 05:35 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
कोळसा कांडावरुन आक्रमक झालेल्या केजरीवाल समर्थकांनी आज दिल्लीत ठिकाठिकाणी निदर्शनं केली. संसद, पंतप्रधान कार्यालय, सोनिया गांधींचे निवासस्थान, भाजप कार्यालय या सर्वच ठिकाणी केजरीवाल समर्थकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी बॅरिकेट्स तोडण्यात आले, तसच सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आज दिल्लीच्या रस्त्यांवर सरकारविरोधात संतापाचा उद्रेक पहायला मिळाला. या आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी काही ठिकाणी लाठीमार केला, काही ठिकाणी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. काही ठिकाणी हवेत गोळीबार केला, तर काही ठिकाणी पाण्याचे फवारेही सोडण्यात आलेत. दिल्लीच्या रस्त्यांवर आंदोलक मोठ्या संख्येनं उतरल्यानं पोलीस सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली. काँग्रेस आणि भाजप एकसारखेच असल्याचा आरोप यावेळी अरविंद केजरीवाल यांनी केला. यानंतर दुपारी तीनच्या सुमारास खुद्द अरविंद केजरीवाल यांनी आंदोलनाचा हेतू साध्य झाल्याचं सांगत, आंदोलकांना घरी परतण्याचं आवाहन केलं.

मुंबईतही मोर्चा...
मुंबईतही इंडिया अगेंन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. मात्र, पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केल्याने एकच गोंधळ उडाला. मयांक गांधी यांच्या नेतृत्वाखाली जुहू सर्कल पासून ते खासदार राजीव शुक्ला यांच्या घरापर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, पोलिसांनी या आंदोलनाकांना मध्येच अडवत ताब्यात घेतलं.
दरम्यान, दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीहल्ल्यामागचे सूत्रधार वेगळेच असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी केलाय. कोळसा खाण घोटाळा प्रकरणात काँग्रेसबरोबर भाजपसुद्धा सहभागी असल्यानं दोघांचेही हात काळे झाले असल्याचे पुरावे आपल्याकडं असल्याचा दावा त्यांनी केलाय.

नेतृत्वात बदल?
आजच्या आंदोलनातून टीम अण्णाच्या नेतृत्वात बदल होत असल्याचं दिसून येतयं. आजच्या आंदोलनावेळी कार्यकर्त्यांनी ‘मै अरविंद हूँ’ अशा नावाच्या टोप्या घातल्या होत्या. एरव्ही ‘मै अण्णा हूँ’ च्या टोप्या घातल्या जात होत्या. मात्र, आंदोलनाच्या रणनितीत बदल करताना यावेळी अण्णांऐवजी अरविंद केजरीवाल यांना आंदोलनाच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आल्याचं दिसून येतंय. एकंदरीतच आता आंदोलनाचं नेतृत्व अण्णांकडून अरविंद केजरीवाल यांच्याकडे सरकत असल्याचंच आता स्पष्ट होऊ लागलं आहे.