`बाबांच्या आंदोलनाला राजकीय झालर` - काँग्रेस

काँग्रेसनं मात्र बाबा रामदेव यांचं आंदोलन राजकीय नसल्याचा दावा फोल असल्याची टीका केलीय. बाबा रामदेव यांच्या व्यासपीठावरील राजकीय नेत्यांची गर्दी पाहून हे आंदोलन राजकीय वळणावर जात असल्याचं स्पष्ट होतंय, असंही काँग्रेसनं म्हटलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 13, 2012, 03:39 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
बाबा रामदेवांना संसदेकडे जाताना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बाबा रामदेव यांचा मोर्चा पोलिसांनी रोखला. बाबा रामदेव यांना पोलिसांनी ताब्यात घेताच समर्थक आक्रमक झाले. काँग्रेसनं मात्र बाबा रामदेव यांचं आंदोलन राजकीय नसल्याचा दावा फोल असल्याची टीका केलीय. बाबा रामदेव यांच्या व्यासपीठावरील राजकीय नेत्यांची गर्दी पाहून हे आंदोलन राजकीय वळणावर जात असल्याचं स्पष्ट होतंय, असंही काँग्रेसनं म्हटलंय.
गेले पाच उपोषणाला बसलेल्या बाबा रामदेवांनी सरकारविरोधात आक्रमक होत आज संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली तेंव्हापासून सरकारच्या पायाखालची जमीन सरकायला सुरूवात झाली होती. सकाळी बाबांनी सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल केला. विशेष म्हणजे भाजप अध्यक्ष नितीन गडकरी आणि शरद यादव यांनीही बाबांच्या मंचावर येऊन पाठिंबा दर्शवल्यानं बाबांच्या आंदोलनाला स्फुरण चढलं होतं. दुपारी एकच्या सुमारास हजारो समर्थकांसह बाबा संसदेकडे रवाना झाले. मात्र, त्यापूर्वीच बाबांना अटक करण्याची जय्यत तयारी पोलिसांनी केली होती. रामलीला मैदानाला पूर्णत: जेलचं स्वरूप आलं होतं. संसदेकडे निघण्यापूर्वी बाबांनी पोलिसांना बॅरिकेट्स काढण्याची विनंती केली. पोलिसांनी बॅरिकेट्स काढलेही मात्र बाबांचा हा मोर्चा रणजितसिंह उड्डाणपुलाजवळ अडवण्यात आला आणि बाबांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान बाबांना बवाना स्टेडियममध्ये ठेवण्यात आलं आहे.

बाबा रामदेवांच्या आंदोलनवर आता सर्वच विरोधी पक्षांनी आपापली भूमिका जाहीर करायला सुरुवात केलीय. मुलायमसिंह यादव यांनी आपला काळा पैसा देशात परत आणण्याला समर्थन असल्याचं स्पष्ट केलंय. मात्र, त्यांनी रामदेवांच्या आंदोलनाला समर्थन देण्याबाबतच्या मुद्याला बगल दिली तर मायावतींनीही मुलायसिंग यादव यांचीच री ओढलीय.

मात्र, आज सकाळी बाबा रामदेवांच्या मंचावरून एनडीएच्या नेत्यांनी यूपीए सरकारवर हल्लाबोल केला. सरकार काळा पैशांबाबत माहिती का लपवत आहे असा सवाल गडकरी यांनी केला. तर काळा पैसा परत आणणं हा एका पक्षाचा नव्हे तर देशाचा अजेंडा असल्याचंही गडकरींनी नमूद केलंय. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा महारोग देशाला जडल्याचा प्रहार जेडीयू अध्यक्ष शरद यादव यांनी यूपीए सरकारवर केलाय. टीडीपी आणि एजीपीचे खासदारांनीही बाबांच्या मंचावर हजेरी लावली होती.