पोलिसांच्या हालचाली पाहण्यासाठी गुन्हेगारांनी लावले सीसीटीव्ही

पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी चक्क गुन्हेगारांनीच सीसीटीव्ही लावल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीमध्ये उघड झाला आहे. 

Updated: May 8, 2016, 04:34 PM IST
पोलिसांच्या हालचाली पाहण्यासाठी गुन्हेगारांनी लावले सीसीटीव्ही title=

नवी दिल्ली: पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी चक्क गुन्हेगारांनीच सीसीटीव्ही लावल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीमध्ये उघड झाला आहे. दिल्लीतल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी अनेक वेळा छापेमारी केली, पण प्रत्येकवेळी पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही. 

त्यानंतर मात्र या जुगाऱ्यांनी पोलिसांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही लावला असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं, यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही रूम असलेल्या ठिकाणीच छापा मारण्याचं ठरवलं. 

अवैधरित्या दारू आणि ड्रग्ज विकणारे, जुगार अड्डा चालवणाऱ्यांनी पोलिसांच्या हालचाली पाहण्यासाठी आपल्या घरामध्येच सीसीटीव्ही लावल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी या घरावर छापा मारण्याचा प्रयत्न केला, तर घरातील महिलाच पोलिसांनी आपल्याला त्रास दिल्याचा आरोप करायची आणि त्यासाठी याच सीसीटीव्ही फूटेजचा दाखला दिला जायचा. 

हा सगळा प्रकार लक्षात आल्यावर दिल्ली पोलिसांनी हे सगळं रॅकेट 10 दिवसांमध्ये उघडकीस आणलं. एकूण तीन ठिकाणी हा प्रकार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  

यामध्ये एका 50 वर्षांच्या महिलेचाही समावेश आहे. सीसीटीव्ही फूटेज पाहणारे पोलीस येत असल्याचं दिसल्यावर या महिलेला माहिती द्यायचे, असाच प्रकार इतर दोन ठिकाणी व्हायचा, ज्यामुळे पोलिसांच्या हाती काहीच लागायचं नाही, असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

हे सीसीटीव्ही संपूर्ण रणनिती आखून लावण्यात आले होते. पोलिसांना हे सीसीटीव्ही दिसणार नाहीत, पण पोलिसांच्या हालचाली लक्षात येतील, अशा ठिकाणी हे सीसीटीव्ही लावण्यात आले होते.