मोदींना वाढदिवसाची मिळणार भेट? Crucial BJP- RSS meet today, all eyes on Modi PM decision

मोदींना वाढदिवसाची मिळणार भेट?

मोदींना वाढदिवसाची मिळणार भेट?
www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली

भारतीय जनता पक्षाकडून नरेंद्र मोदींना वाढदिवसाची खूप मोठी भेट मिळू शकते. १७ सप्टेंबरला मोदींच्या वाढदिवशी त्यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आजपासून सुरू झालेल्या बैठकीत याबाबतचा अखेरचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

भाजपच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा कधी केली जाते, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. याबाबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमध्ये आज सुरू झालेल्या दोन दिवसीय बैठकीत निर्णय होवू शकतो. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बैठक सुरू होण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजनाथ सिंह लवकरात लवकर मोदींची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करु इच्छितात. मात्र लालकृष्ण अडवाणींसह सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि आणखी काही नेते अद्याप घोषणा करू इच्छित नाही. याबाबत राजनाथ सिंह लवकरच संसदीय कार्यकारणीची बैठक बोलावण्याची शक्यता आहे.

संघाकडून मोदींच्या नावाची घोषणा व्हावी यासाठी भाजपवर दबाव टाकण्यास सुरुवात केलीय. संघानं आपला निर्णय भाजपला सांगितलाय. मनमोहन वैद्य यांनी याबाबत सांगितलं की, “आम्ही संघाची भूमिका स्पष्ट केलीय. आता पक्षाला कोणाच्या नावाची घोषणा करायची हा निर्णय घ्यायचाय, आम्ही आमचं मत सांगितलंय.”

त्यामुळं आज दिल्लीत सुरू झालेल्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, September 08, 2013, 11:50


comments powered by Disqus